निर्यातीमुळे साखर बाजार स्थिर राहील : दिलीप वळसे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:58 PM2018-03-29T21:58:15+5:302018-03-29T21:58:15+5:30
चांगला मॉन्सून झाल्याने उसाच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. परिणामी साखरेचे उत्पादनही वाढले.
पुणे : परतीच्या पावसामुळे उसाचे वजन वाढले असून, साखर उतारा देखील चांगला मिळाला आहे. परिणामी देशातील साखरेचे उत्पादन तीनशे लाख टनांवर पोहोचले आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या साखर निर्यातीच्या धोरणामुळे स्थानिक बाजारातील भाव टिकून राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
हंगामपूर्व अंदाजात देशात २५१ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, चांगला मॉन्सून झाल्याने उसाच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. परिणामी साखरेचे उत्पादनही वाढले. हंगामाच्या सुरुवातीला ४० लाख टन साखर शिल्लकीत होती. आता २९५ ते ३०० लाख टन साखरेची उपलब्धता आहे. म्हणजेच आजच्या घडीला ३३५ ते ३४० लाख टन साखर देशात शिल्लक आहे. देशांतर्गत वार्षिक गरज सरासरी २५५ लाख टन इतकी आहे. त्यामुळे ८० ते ८५ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. या बाबी केंद्र सरकारच्या निर्दर्शनास आणून दिल्या होत्या.
एप्रिल ते सप्टेंबर २०१८ दरम्यान निर्यात कोटा पूर्ण करणाºया कारखान्यांना आॅक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत शून्य टक्के आयात दराने कच्ची साखर आयात करण्याचा अंतर्भाव देखील या योजनेत आहे. तसेच, सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार निर्यात केल्यानंतरही तोटा होणार असला तरी २० लाख टन साखर देशाबाहेर जाईल. त्यामुळे देशातील साखरेचे दर नियंत्रणात राहतील. त्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकºयांना समाधानकारक दर देता येईल, असे वळसे-पाटील म्हणाले.