साखर कारखान्यांचे गाळप आजपासून; राज्यात १०६ कारखान्यांना परवान्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:46 AM2017-11-01T11:46:46+5:302017-11-01T11:51:58+5:30
राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार ३१ सप्टेंबर अखेरपर्यंत १०६ कारखान्यांना परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून (दि. १) गाळप हंगामास सुरुवात होणार असून कारखान्याचे बॉयलर पेटणार आहेत.
पुणे : राज्यातील साखर कारखाने सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार ३१ सप्टेंबर अखेरपर्यंत १९१ कारखान्यांनी आॅनलाईन परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील १०६ कारखान्यांना परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून (दि. १) गाळप हंगामास सुरुवात होणार असून कारखान्याचे बॉयलर पेटणार आहेत.
राज्य शासनाने गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांना आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षाची किमान आधारभूत रक्कम थकविल्यामुळे (एफआरपी) १४ कारखान्यांना परवाने नाकारण्यात आले. त्यामुळे हे कारखाने बंद राहणार आहेत.
कृषी आयुक्त संभाजी कडू-पाटील म्हणाले, ‘‘यंदा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार्या गळीत हंगामासाठी राज्यभरातून १९१ कारखान्यांनी आॅनलाइन अर्ज केले. त्यापैकी त्रुटीपूर्तता केलेल्या १०६ कारखान्यांना परवाने वितरित केले असून आणखी काही कारखान्यांना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम सुरू झाला होता. तसेच, ५० कारखाने सुरू झाले होते. मात्र, यंदा पहिल्या दिवशी १०६ कारखाने सुरू होत आहेत.’’
‘एफआरपी’नुसार पैसे न दिलेल्या कारखान्यांना यंदा गाळपाची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच, यंदा दोन नवीन साखर कारखाने सुरू होत आहेत. तसेच, यंदा काही बंद पडलेले कारखानेही सुरू होत आहेत.
बंद कारखाने पुन्हा सुरू होणार
विविध कारणांमुळे बंद अवस्थेत असलेले ५ कारखाने पुन्हा सुरू होणार आहेत. त्यात बीडच्या अंबाजोगाई आणि जयभवानी साखर कारखान्याचा तसेच नगर येथील बाबा तनपुरे कारखाना, नाशिकमधील के. के. वाघ कारखाना, तर औरंगाबाद येथील घृष्णेश्वर साखर कारखाना यांचा समावेश आहे. यंदाच्या गळीत हंगामामध्ये शिरूर येथील ‘पराग अॅग्रो’ कारखाना सुरू होत आहे.