जिल्हा बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढ
By admin | Published: January 8, 2016 01:40 AM2016-01-08T01:40:33+5:302016-01-08T01:40:33+5:30
राज्य बँकेपाठोपाठ आता जिल्हा बँकेनेही साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल १३० रुपयांनी वाढ केल्याने ते २ हजार ३८५ रुपयांवरून २ हजार ५१५ रुपयांवर गेले आहे
सोमेश्वरनगर : राज्य बँकेपाठोपाठ आता जिल्हा बँकेनेही साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल १३० रुपयांनी वाढ केल्याने ते २ हजार ३८५ रुपयांवरून २ हजार ५१५ रुपयांवर गेले आहे. डिसेंबर महिन्यात ११५ रुपयांची वाढ व आता १३० रुपयांची वाढ मूल्यांकनात करण्यात आली आहे. अवघ्या एक महिन्याच्या फरकाने मूल्यांकनात तब्बल २४५ रुपये वाढ मिळाल्याने ऊसउत्पादक व कारखानदार सुखावले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात जिल्हा बँक कारखानदारांना एका क्विंटलला २ हजार २७० रुपये मूल्यांकन देत होते. यामध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मूल्यांकनात ११५ रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते २ हजार ३८५ रुपयांवर गेले होते. तसेच आता दोन दिवसांपूर्वी पुन्हा १३० रुपयांची वाढ केल्याने ते २ हजार ५१५ रुपयांवर गेले आहे. अवघ्या एका महिन्याच्या फरकानेच मूल्यांकनात २४५ रुपयांची एवढी घसघसीत वाढ झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
गेल्या वर्षीपेक्षा साखरेच्या मूल्यांकनाची परिस्थिती या वर्षी चांगली आहे. गेल्या वर्षी हंगाम सुरुवातीलाच साखरेच्या मूल्यांकनात वारंवार कपात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी २४५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एफआरपी देण्यासाठी कारखानदारांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण चालू हंगामात जिह्यातील कारखान्यांची एफआरपी २ हजार १५० ते २ हजार ३५० च्या दरम्यान आहे. साखरेच्या २ हजार ५१५ रुपयांच्या मूल्यांकनातून ९० टक्क्यांप्रमाणे कारखादारांना २ हजार २६३ रुपयेच मिळणार आहेत. यामधून ७५० रुपये कारखान्याचा व्यवस्थापन खर्च वजा जाता ऊसउत्पादकांना देण्यासाठी कारखानदारांच्या हातात १ हजार ५१३ रुपयेच उरत आहेत.