भारतातही साखरेच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:15 AM2021-08-24T04:15:03+5:302021-08-24T04:15:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : परदेशात वाढले तसेच देशातही साखरेचे दर वाढल्याने साखर कारखानदारांमध्ये कधी नव्हे ते आनंदाचे वातावण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परदेशात वाढले तसेच देशातही साखरेचे दर वाढल्याने साखर कारखानदारांमध्ये कधी नव्हे ते आनंदाचे वातावण आहे. घाऊक बाजारातील दर ३३ रूपयांहून थेट ३६ ते ३७ रूपये किलो झाले असून किरकोळ बाजारात साखर ३८ ते ४० रूपये दराने मिळते आहे. अनेक महिने गोदामात पडून असलेली साखर कारखान्यांनी आता विक्रीसाठी खुली केली असून साखरेच्या व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
उत्तर प्रदेशातील साखरचे उत्पादन यावर्षी नेहमीपेक्षा कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच अन्य राज्यातूनही साखरेची मागणी मोठ्या प्रमाणावर होते आहे.
केंद्र सरकार साखरेचा दरमहा विक्री कोटा जाहीर करते. या महिन्यासाठी २१ लाख टन कोटा जाहीर झाला आहे. साखरेची विक्री कारखानदारांना ३१ रूपये किलोपेक्षा कमी दराने करता येत नाही. त्यावरचा जीएसटी धरता साखर ३३ रूपये दराने कारखान्यांडून विकली जात होती. आता ही किंमत ३६ ते ३७ रूपये किलो झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साखरेचे सौदे होत असून बहुसंख्य कारखानदारांनी साखरेचे शिल्लक साठे विक्रीस काढले आहेत. सणवारांचा कालखंड सुरु झाला आहे. श्रावणानंतर गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण-उत्सव येणार आहेत. या काळात साखरेची मागणी वाढणार असून हेच दर कायम राहावेत असे साखर व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
चौकट
“साखरेला खप नसल्याने गोदामातील साखरेवर कर्ज काढून कारखान्यांना उस उत्पादकांचे पैसे द्यावे लागत होते. यात कारखान्यांना तोटा होत होता. मध्यंतरी इथेनॉलच्या विक्रीमुळे यात थोडा फरक पडला. आता दर वाढल्याने कारखानदारांचा फायदा होणार आहे. साखरेच्या दरात गेली काही वर्ष काहीच वाढ होत नव्हती. आता याच महिन्यात साखर किलोमागे ३ ते ५ रूपयांनी वाढली. विक्रीचा कोटा वाढवून मिळाला तर कदाचित दर नियंत्रणात राहतील, अन्यथा येत्या काळात दरात आणखी वाढ अपेक्षित आहे.”
-विजय गुजराथी, अध्यक्ष, शुगर मर्चंट असोसिएशन.