साखरेचे दर घसरले, राज्य बँकही मूल्यांकनात घट करण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:37 AM2018-03-17T00:37:47+5:302018-03-17T00:37:47+5:30
सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे.
सोमेश्वरनगर : सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे. मागील महिन्यात साखरेच्या दरात तब्बल ३०० रुपयांची घसरण झाली आहे. ३२०० रुपये क्विंटलवर असणारे साखरेचे दर २९०० रुपयांवर आले आहेत.
जानेवारीत साखरेच्या दरात घसरण झाली होती. त्या वेळी राज्य बँकेने मूल्यांकनही कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना आता एफआरपी देणेही कठीण बनले होते. या नंतर साखरदरात पुन्हा सुधारणा झाली होती. १२ फेब्रुवारी रोजी साखरेचे दर ३२०० रुपये क्विंटलवर होते. मात्र, महिन्याभरातच या दरात घसरण होत काल १५ मार्चला हे दर ३०० रुपयांनी खाली येत २९०० रुपयांवर आले. मागच्या वेळी साखर दर खाली आल्याने काही कारखान्यांनी तर जाहीर केलेल्या ऊसदरातही कपात करण्यास सुरुवात केल्याने साखर उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. सगळेच साखर कारखाने उसाचा भाव कमी करतात की काय, अशी धास्ती ऊसउत्पापदकांनी घेतली आहे.
नोव्हेंबर २०१७मध्ये बाजारातील साखरेचे दर ३ हजार ६०० रुपये क्विंटलवरून जानेवारीत २ हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत घसरले होते. त्यामुळे राज्यातील साखर कारखाने पुन्हा एकदा शॉर्ट मार्जिनमध्ये जातात की काय, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले आहेत. साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ६०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागण्याची चिन्हे आहेत. साखर कारखाने सुरु होताना साखरेला ३ हजार ६००च्या आसपास दर होते. त्यामुळे राज्य बँक साखरेचेही चांगले मूल्यांकन करत होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत साखरेचे दर तब्बल ६०० रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे बँकेनेही साखरेचे मूल्यांकन क्विंटलमागे ४०० रुपयांनी कमी केले. राज्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचेही बंपर उत्पादन होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने साखरेचे दर उतरले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या राज्य बँक साखर कारखान्याना एका क्विंटल साखरेवर ८५ टक्के प्रमाणे २ हजार ६३५ रुपये उचल देत आहे. यामधून टनामागे ७५० रुपये उत्पादन खर्च वजा केला असता ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांच्या हातात केवळ १ हजार ८८५ रुपये उरत आहेत. तर दुरीकडे यावर्षीची एफआरपी २ हजार ६४२ रुपयांच्या आसपास असल्याने ऊसउत्पादकांना देवायची रक्कम व उत्पादन खर्च वजा जाता कारखानदारांच्या हातात उरणारी रक्कम याचा हिशेब केला असता एफआरपी भागविण्यासाठी कारखानदारांना ७५७ रुपये कमी पडत असल्याने ऊसउत्पादकांची एफआरपी कशी भागावणार? या चिंतेत कारखानदार सापडेल आहेत.
सध्या साखर हंगाम सुरू आहे त्यामुळे बँकेचे मूल्यांकन कमी असूनही कारखानदारांनी पदरचे ७५७ रुपये टाकून २ हजार ६४२ रुपये एफआरपी सभासदांना अदा केली आहे. मात्र यासाठी कारखानदारांना इतर खर्चात काटकसर करत एफआरपी भागवावी लागली आहे.