साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट; एआयच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल, हर्षवर्धन पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:52 IST2025-03-24T12:51:44+5:302025-03-24T12:52:12+5:30

एआयच्या मदतीने उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवता येते तर ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येतो

Sugar production in the country has decreased by 17 percent Production can be increased with the help of AI, says Harshvardhan Patil | साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट; एआयच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल, हर्षवर्धन पाटलांची माहिती

साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट; एआयच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल, हर्षवर्धन पाटलांची माहिती

पुणे: निवडणुका, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे देशातील साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटले आहे. मागील आर्थिक वर्षांतील देशातील २९० लाख मेट्रिक टनाच्या तुलनेत यंदा २४१ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. या हंगामात ५३३ साखर कारखान्यांपैकी ३८० कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ५३४ कारखान्यांपैकी केवळ २४० कारखाने बंद झाले होते. साखरेचे उत्पादन घटल्याने दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘उसाच्या गळितावर आणि साखरेच्या उताऱ्यावर परिणाम झाल्याने साखर कारखाने लवकर बंद होत आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या साखर उत्पादनात अग्रेसर राज्यांतील साखर उद्योगाला फटका बसला आहे. राज्यात ८३८ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून, मागील हंगामात झालेल्या १०३० लाख मेट्रिक टनापेक्षा ते १८.६५ टक्क्यांनी कमी आहे. ७९.२० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले असून, ते मागील वर्षीच्या १०५ लाख मेट्रिक टनापेक्षा २४ टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील २०० पैकी १८० कारखाने बंद झाले आहेत. मागील वर्षी ही संख्या केवळ १०३ होती,’ अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

‘उत्तर प्रदेशातील उसाचे गाळप ८७५ लाख मेट्रिक टन झाले असून, ते मागील वर्षी ८७६ लाख मेट्रिक टन होते. मागील वर्षी ९२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, यंदा ८४ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी देशांतर्गत घरगुती वापरासाठी साखरेचा विक्री कोटा १३७.५० लाख मेट्रिक टन निर्धारित केला होता. उत्पादन घटल्याने एस ग्रेड साखरेची किंमत ३७८० ते ३८३० रुपये प्रतिक्विंटल आणि एम-ग्रेड साखरेची किंमत ३९६५ ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. इथेनॉल उत्पादनात प्रगती झाली असून, ३०३ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमिश्रणासाठी वापरण्यात आले आहे. आगामी आर्थिक वर्षांत साखर उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अंदाजे ११० ते १२० आणि देशात ३५० लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘देशात उसाचे क्षेत्र ६० लाख हेक्टर असून उत्पन्न ८० टन प्रतिहेक्टरवर थांबले आहे. उसाचे दर्जेदार उत्पादन, आर्थिक विकास आणि साखर उद्योगाला स्थैर्य मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर अनिवार्य झाला आहे. एआयच्या मदतीने उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवता येते तर ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येतो, हे मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रात्यक्षिकांसह दाखविले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात याचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले,’ असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sugar production in the country has decreased by 17 percent Production can be increased with the help of AI, says Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.