पाण्याअभावी ऊस, केळी पिके गेली वाया
By admin | Published: May 19, 2017 04:33 AM2017-05-19T04:33:48+5:302017-05-19T04:33:48+5:30
इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीच्या बागा चक्क सोडून दिल्या आहेत.
- लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीच्या बागा चक्क सोडून दिल्या आहेत. तर उसाला पाणी मिळत नसल्यामुळे परिसरातील पिके वाया गेली आहेत.
उष्णतामान सतत वरचेवर वाढत असल्याने याचा परिणाम शेतातील पिकावर झालेला आहे. तालुक्यात पश्चिमेकडील भागात थोरातवाडी, लासुर्णे, बेलवाडी या भागात शेकडो एकरात केळीची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात ही गावे केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. मात्र या वर्षी तीव्र उन्हाळा असल्याने विहिरीच्या पाण्याने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला आहे. इंधन विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्याने उसाला व केळीला पाणीपुरवठा करणे अवघड झाले असल्याने शेतकऱ्याने उसाच्या व केळीच्या बागेकडे दुर्लक्ष केलेले आहे.
पाणीच नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे केळी व ऊस जळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. ऊसपिके जागेवर जळून गेल्यामुळे तालुक्यातील तीनही सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर याचा परिणाम होणार आहे. डाळिंबाच्या बागेकडेही शेतकऱ्याने दुर्लक्ष केल्याने डाळिंबाच्या बागा जागेवर होरपळून जळून खाक होताना दिसत आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तहसीलदारांनी जागेवर पंचनामा करून आर्थिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे.