जिल्ह्यात १२ लाख ८७ हजार टन उसाचे गाळप
By admin | Published: November 22, 2014 12:37 AM2014-11-22T00:37:09+5:302014-11-22T00:37:09+5:30
अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप आता पूर्वपदावर आले आहे.
सोमेश्वरनगर : अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप आता पूर्वपदावर आले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी मिळून १२ लाख ८७ हजार ५२ टन उसाचे गाळप करून १२ लाख ४५ हजार ६५५ पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. मात्र, अवकाळी पावसाने व्यत्ययाने थंडीचे प्रमाण नसल्याने साखरउतारा अजून दहा टक्क्यांवरच घुटमळत आहे. जिल्ह्यातील भीमा पाटस व राजगड कारखान्यांची धुराडी अजून बंदच आहेत.
या वर्षी साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याअगोदर कारखान्यांपुढे अनेक विघ्ने उभी राहिली होती.
ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे कारखाने जोमाने सुरू होण्यासाठी १० नोव्हेंबर उजाडला.
चालू महिन्यात अवकाळी पावसामुळे थंडीच गायब झाल्याने कारखान्यांना साखर उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हा साखर धंद्यातील ‘हाय रिकव्हरी पिरेड’ म्हणून ओळखला जातो. मात्र, अजूनही साखर कारखान्यांचे सरासरी साखरउतारे दहा टक्क्यांवरच घुटमळत आहेत.
१५ कारखान्यांपैकी भीमा पाटस, राजगड कारखाने वगळता उर्वरित १३ कारखान्यांमध्ये गाळपाच्या व साखर उत्पादनाच्या बाबतीत सहकारी साखर कारखान्यांच्या पुढे खासगी कारखाने गेले आहेत.
बारामती अॅग्रो कारखान्याने १ लाख ९२ हजार ७९० टन उसाचे गाळप करून २ लाख २ हजार ६५० पोत्यांचे उत्पादन घेत पहिल्या स्थानावर आहे. तर १ लाख ६४ हजार १०० टन उसाचे गाळप करून १ लाख ५५ हजार ८०० पोत्यांचे उत्पादन घेत विघ्नहर दुसऱ्या स्थानावर, तर १ लाख ९ हजार ७८० टन उसाचे गाळप करून १ लाख ११ हजार ६०० पोत्यांचे उत्पादन घेत दौंड शुगर तिसऱ्या स्थानावर आहे. सरासरी साखर उताऱ्यातही ११.२ टक्क्यांचा उतारा ठेवत बारामती अॅग्रोने आघाडी घेतली आहे. (वार्ताहर)