विहिरीकाठी घरट्यांसाठी सुगरणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:36+5:302021-08-26T04:12:36+5:30
मे ते सप्टेंबर महिण्याचा कालावधी हा याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करत ...
मे ते सप्टेंबर महिण्याचा कालावधी हा याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करत असतो. हे घरटे गवताच्या काड्या,काटक्या,गवत,पाने, कापूस इतर वनस्पतीपासून सुगरण पक्षी विहिरीच्या काठावर असलेल्या साध्या बाभळीच्या झाडांवर विणत असतात. बाया, विणकर, गवळण अशी वेगळी मराठीतील नावे चिमणीच्या आकाराचा लहान पक्षी असणाऱ्या या सुगरण पक्ष्याचे आहेत.
विणीच्या हंगामात नराचे डोके पिवळे, पाठीवर पिवळ्या-तपकिरी रेषा, छातीचा भाग पिवळा तर उर्वरित भाग फिकट पांढरा, सायीसारखा पाहावयास मिळतो. एकावेळी ४ ते १० अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर सुगरण घरट्यांच्याजवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणत असतो.मादी आल्यावर प्रत्येक घरटे तपासून पाहून घरटे पसंत पडल्यावरच त्या नराशी मादी मिलन करत असते.नंतर मादी उर्वरित घरटे पूर्ण करते. पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी जर एकही घरटे मादीला पसंत पडले नाही, तर नर ते झाड किंवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरू करतो.
घरट्याच्या खालच्या बाजूने आतमध्ये जाण्याचा मार्ग असून खालून निमुळता आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार असते. साधारणपणे घरट्यात दोन किंवा जास्त कप्पे तयार केलेले असतात.घरट्याच्या गोलाकार भागात ओल्या मातीचा गिलावा असतो.एकावेळी मादी २ ते ४ शुभ्र पांढºया रंगाची अंडी घालत असते. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते. असे सुंदर खोप्यांचे सौंदर्य ग्रामीण भागातील विहिरींच्या काठावरती जास्त प्रमाणात पाहायला मिळते.
उंडवडी कडेपठार मधील बनकरवस्ती येथील बारापरस विहिरीकाठच्या ठिकाणी सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांचे सौंदर्याचे टिपलेले छायाचित्र. (छायाचित्र :- समीर बनकर)
२५०८२०२१-बारामती-०३