ऊसतोड कामगार संघटनांंना आता प्रतीक्षा लवादाच्या बैठकीची; कामगार मंत्रालय घेणार पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 01:03 PM2020-09-18T13:03:16+5:302020-09-18T13:03:59+5:30
मजुरीवाढ, आरोग्य सुविथांवर संघटना ठाम
पुणे: कोरोनापासून विमा कवच मजुरीच्या दरात वाढ व आरोग्यसुरक्षा या मागण्या मान्य झाल्याशिवाय घराबाहेर पडणार नसल्याचा इशारा सरकारला देणाऱ्या ऊसतोडणी कामगार संघटनांना आता यासंबधी कामगार मंत्रालयाने स्थापन केलेल्या लवादाच्या बैठकीची प्रतीक्षा आहे.
युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना हा लवाद स्थापन करण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, दिलीप वळसे, जयंत पाटील तसेच स्वतः मुंडे यांचा समावेश होता. आता अन्य सदस्य कायम असून गोपीनाथ मुंडे यांच्या जागेवर माजी मंत्री पंकजा मुंडे असून कामगारांच्या मजुरीतील वाढ व कामगारविषयक अन्य प्रश्नांवर लवादाकडूनच निर्णय होत असतो.
राज्यातील ८ प्रमूख ऊसतोडणी कामगार संघटनांंनी कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक कामगाराचा ५ लाखांचा विमा काढावा, मरी टनामागे ४०० रूपये करावी व कामगारांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी आरोग्यसुविथा द्याव्यात अशी मागणी केली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एकही कामगार घराबाहेर पडणार नाही असा इशाराही दिला आहे.
या संघटनांमधील ज्येष्ठ पदाधिकारी गहिनीनाथ थोरे म्हणाले, शरद पवार यांना आम्ही कामगारांच्या सर्व अडचणी सांगितल्या आहेत. काही लाख कामगारांचा जीव आम्हाला महत्वाचा वाटतो. त्यांचे आरोग्य महत्वाचे आहे. सरकारने ही जबाबदारी घ्यायला हवी. कारखान्यांमधील अधिकारी, संचालक ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात असाच आमचा अनुभव आहे.
लवादाच्या बैठकीत काय होते याकडे आमचे लक्ष आहे. कामगारांचे म्हणणे त्यांच्यापर्य़त पोहचवले आहे. आता या बैठकीचीच प्रतिक्षा आहे असे थोरे म्हणाले.
दरम्यान ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यात कारखान्यांचे बॉयलर पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्यातच ऊसतोडणी कामगारांना बाहेर पडावे लागणार आहे. बहुसंख्य कामगार नगरच्या पुढे बीड व मराठवाडा परिसरातीलच असून काही लाखांच्या संख्येने ते पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या ऊसक्षेत्रात ऊसतोडणीसाठी म्हणून स्थलांतर करतात. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने होणारे स्थलांतर प्रशासानासाठी आव्हान असणार आहे.