वाहतूक दरवाढ न केल्यास ऊस वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:11 AM2021-01-23T04:11:16+5:302021-01-23T04:11:16+5:30
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक संघटनेने बंदचे हत्यार उपसले असून वाहतूक दरवाढ न ...
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक संघटनेने बंदचे हत्यार उपसले असून वाहतूक दरवाढ न केल्यास ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आज संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ऊस वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते.
यावेळी सोमेश्वर ऊस वाहतूक संघटनेने सोमेश्वर कारखान्याला दिलेल्या पत्रात म्हले आहे, की आम्ही वारंवार आपणास वाहतूक दरवाढीचे पत्र देत आहोत, मात्र अजूनही यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही. सध्याचे डिझेलचे दर, चालक पगार, इन्शुरन्स, टॅक्स, टायर तसेच स्पेयर पार्टचे दर प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे सद्याच्या दरात वाहतूक करणे परवडत नाही. म्हणून आमच्या पत्राचा विचार करून वाहतुकीत दरवाढ करावी अन्यथा दि २७ पहाटे ४ पासून आम्ही ऊस वाहतूक करणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे.
डिझेलचे दर ५८ ते ६० रुपयांवर असताना वाहतूक दरवाढ केली होती. यामध्ये २५ रुपयांची वाढ झाली असून वाहतूक दरवाढ मात्र तेवढीच आहे. सोमेश्वर कारखाना जिल्ह्यात सर्वच बाबतीत प्रथम निर्णय घेत असतो मग वाहतूक संदर्भात प्रथम निर्णय का घेत नाही?
प्रदीप काकडे - अध्यक्ष सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटना
२२ सोमेश्वरनगर
सोमेश्वरनगर येथे ऊस वाहतूकदारांची बैठक पार पडली.