ऊसक्षेत्राची पडताळणी होणार ऑनलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 12:03 PM2019-08-27T12:03:32+5:302019-08-27T12:07:47+5:30
उत्तर प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचे उत्पादन होते.
पुणे : ऊसक्षेत्र, सभासदसंख्या व कारखान्यांत होणाऱ्या गाळपाचा अचूक अंदाज यावा, यासाठी ऊसक्षेत्राची ऑनलाईन पडताळणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साखर आयुक्तालयाने हाती घेतला आहे. एकच सभासद दोन वेगवेगळ्या कारखान्यांत असल्यास त्याची माहिती समजणार असून दुबार नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती हाती येणार आहे. त्यामुळे कारखान्यांकडून सांगितले जाणारे क्षेत्रही अचूक येण्यास मदत होईल. परिणामी, गाळप हंगामाबाबत अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार असून, त्याप्रमाणे सरकारला धोरण ठरविणेदेखील सोपे जाईल.
उसाचे सरासरी क्षेत्र ९ लाख ४ हजार हेक्टर आहे. उत्तर प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचे उत्पादन होते. गेल्या दोन हंगांमात महाराष्ट्राने १०७ लाख टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने साखर उत्पादन ९० ते ९५ लाख टनांदरम्यान राहील, असा अंदाज सुरुवातीला वर्तविला होता. हा अंदाज फोल ठरवत साखर उत्पादनाने विक्रमी १०७ लाखांचा टप्पा गाठला. दुष्काळाच्या काळात तर दुसऱ्या कारखाना क्षेत्रातील ऊस दाखविण्याकडे काही कारखान्यांचा कल असतो. त्यामुळेदेखील नियोजनात चूक होऊ शकते.
याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘‘कारखाना क्षेत्रातील उसाचा अचूक अंदाज यावा, यासाठी आगामी गाळप हंगामापासून ऊसक्षेत्राची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे एक शेतकी सभासद किती कारखान्यांना ऊस देतो, त्याचे क्षत्र किती, याची माहिती मिळेल. अनेकदा काही ठिकाणी ऊसक्षेत्र फुगविले जाते. त्यामुळे उत्पादनाचा अंदाज बांधणे अवघड होते. अहमदनगर जिल्ह्यात सुरुवातीला ९८ लाख हेक्टर क्षेत्र दिले होते. नंतर केलेल्या तपासणीत ते ५० लाख
हेक्टर भरले. एकाच शेतकºयाचे क्षेत्र अनेक कारखान्यांनी दाखविल्याने असे झाले.
एखादा शेतकरी अनेक कारखान्यांना ऊस जरी देत असला, तरी त्याच्या क्षेत्रापैकी तो किती क्षेत्रावरील ऊस कोणकोणत्या कारखान्यांना देतो, याची नोंद हवी. पुढील टप्प्यात महसूल विभागाकडे सात-बारा उताºयावर नोंद झालेला ऊसच ग्राह्य धरण्यात येईल. महसूल विभागाची माहिती साखर आयुक्तालयाच्या संकेतस्थळाला जोडण्यात येईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
....
ऊस उत्पादन अधिक अचूक अंदाज वर्तविता येणार
गावनिहाय ऊसक्षेत्राची माहिती ठेवण्यात येणार आहे. आगामी हंगामापासून या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात होईल. येत्या आठ दिवसांत हा प्रकल्प सुरू होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, त्यांचे क्षेत्र व किती कारखान्यांना त्यांचा ऊस जातो, याची माहिती समजेल. त्यामुळे ऊस उत्पादनाचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होईल.- शेखर गायकवाड, साखर आयुक्त
..............