दरवाढ न मिळाल्यास ५ जानेवारीपासून साखर कारखाने बंद पाडू, ऊसतोड कामगार संघटनेचा इशारा
By नितीन चौधरी | Published: December 27, 2023 07:41 PM2023-12-27T19:41:42+5:302023-12-27T19:42:40+5:30
कामगारांच्या मागणीबाबत ऊसतोड कामगार महामंडळ तसेच राज्य सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही सानप यांनी यावेळी केला आहे...
पुणे : ऊस तोडणीसाठी प्रति टन किमान पाचशे रुपये मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील ऊसतोड कामगार उपोषणाचे अस्त्र उगारणार असून ५ जानेवारीनंतर सर्व कारखाने बंद पाडू असा इशारा ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब यांनी दिला आहे. कामगारांच्या मागणीबाबत ऊसतोड कामगार महामंडळ तसेच राज्य सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही सानप यांनी यावेळी केला आहे.
राज्यात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनला प्रति टन साडेपाचशे रुपये दिले जातात. मात्र, कामगारांची केवळ २७० रुपयांमध्येच बोळवण केली जात आहे. कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला पूर्ण मिळत नसल्याचा आरोप करत हा दर किमान पाचशे रुपये असावा अशी मागणी सानप यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील सकारात्मक असून राज्य सरकारनेही याकडे लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात सानप यांनी साखर आयुक्तालयात निवेदन दिले आहे. ऊसतोड दराबाबत ४ जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास ५ जानेवारीपासून राज्यातील सर्व कारखाने बंद पाडू असा इशारा सानप यांनी यावेळी दिला. राज्यात सुमारे २५ लाख कामगार असून कामगार मृत पावल्यास किंवा बैल मृत पावल्यास कोणतीही भरपाई मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात ऊसतोड कामगार महामंडळदेखील कामगारांकडे दुर्लक्ष करत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कष्टकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी सर्व कारखाने बंद पाडून साखर सम्राटांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे ते यावेळी म्हणाले. या आंदोलनात बैलगाड्यांसह ट्रॅक्टरदेखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.