उसाचे पाचट शेतात कुजविणे ठरते फायदेशीर
By admin | Published: July 24, 2015 04:37 AM2015-07-24T04:37:37+5:302015-07-24T04:37:37+5:30
जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांची नितांत गरज आहे. त्यासाठी लागणारे शेणखत कमी पडू लागले आहे. यावर शेतकऱ्यांकडे उसाचे
महेश जगताप (सोमेश्वरनगर)
जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांची नितांत गरज आहे. त्यासाठी लागणारे शेणखत कमी पडू लागले आहे. यावर शेतकऱ्यांकडे उसाचे पाचट कुजविणे हा अत्यंत सोपा पर्याय आहे, मात्र गैरसमजापोटी अनेक शेतकरी पाचट पेटवून देत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी पाचटाचे महत्त्व समजून घेऊन ते शेतातच कुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सेंद्रिय पदार्थांवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते. परंतु, रासायनिक खते, पाण्याचा अतिवापर, औषधांच्या अमर्याद वापरामुळे जमिनी क्षारपड आणि चोपण होत चालल्या आहेत. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करून त्या सुधारण्याशिवाय आता शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही. सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीतील अन्नघटक पिकास योग्य प्रकारे घेता येतो. जमीन भुसभुशीत होऊन जिवाणूंची संख्याही वाढते. परिणामी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदाच होतो. अलीकडच्या काळात शेणखत आणि कंपोस्ट खताचा तुटवडा भासू लागला आहे. तसेच रासायनिक खतांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे उसाचे पीक तुटून गेल्यावर विनापैशाचे सेंद्रिय खत शेतकऱ्यांच्या रानात पडून असते.
शेतकरी मात्र ते कुजविण्याऐवजी थेट उसाच्या पाचटाला काडी लावून देतो. त्यामुळे तो चांगले सेंद्रिय खतच नष्ट करतो. त्याऐवजी पाचट नांगरट करून कुजविणे किंवा त्याची पाचट कुटी करून खत तयार करणे शेतकऱ्यांचा फायद्याचे आहे. तसेच रानातच पाचट ठेवल्यामुळे त्याचे अनेक फायदे शेतकऱ्याला होतात. पाचटाचा जमिनीला आच्छादन म्हणून उपयोग होतो. आच्छादनामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, शिवाय ऊसपिकास बऱ्याच काळापर्यंत मुळांजवळ पाण्याचा ओलावा राहतो. पाचट विघटनातून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढते. तसेच जमिनीचा कसही वाढतो.
उसापासून साखर तयार होते. साखरेत सुक्रोज असते, सुक्रोजमध्ये कार्बन, हायड्रोजन व आॅक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. याचाच अर्थ उसासाठी वापरलेले नत्र, स्फुरद व पालाश ही मूलद्रव्ये साखरेत येत नाहीत. कारण ही बहुतांश मूलद्रव्ये साखरेत असतात. हे पाचट पुन्हा रानातच राहते. सर्वसाधारण एक हेक्टर उसापासून आठ ते दहा टन पाचट मिळते. त्यामध्ये ३५ किलो नत्र, १३ किलो स्फुरद व ६५ किलो पालाश असते. मग हे पाचट जाळून शेतकरी अमूल्य अशी मूलद्रव्ये नष्ट करत असतो. आता रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत.