टॅटुमुळे लागला सुगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:28 AM2020-12-13T04:28:32+5:302020-12-13T04:28:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केअर टेकर म्हणून काम करताना रेकी करायची व त्यानंतर त्याच ठिकाणी दरोडा घालणार्या संदीप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केअर टेकर म्हणून काम करताना रेकी करायची व त्यानंतर त्याच ठिकाणी दरोडा घालणार्या संदीप हांडे याने आतापर्यंत पिंपरी चिंचवड व पुण्यात ४ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. गुरुराज सोसायटीत त्याने इतरांच्या मदतीने घातलेल्या दरोड्याच्या वेळी त्यांनी मास्क घातला होता. त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. मात्र, हांडे याने त्याच्या हातावर टॅटू काढला होता. तो फिर्यादी यांनी ओळखला. हांडे व त्याचे साथीदार पळून जात असताना हांडे याने फिर्यादी यांचा मोबाईलही घेतला होता. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना मोबाईल न घेऊन जाण्याची विनंती केली. त्यावेळी हांडे याने मोबाईल हातात घेऊन त्यांचा नंबर डिलीट केला होता. ओळखीचा आवाज व त्याने मोबाईलमधील डिलीट केलेला नंबर यामुळे घरात चोरी करणारा हा हांडेच असावा, असा संशय निर्माण झाला होता. मोबाईल आणि हातावरील टॅटू यामुळे हांडेच सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. ते गोव्याला पळून जात असताना कोथरुड पोलिसांनी त्यांना पकडले.
अटक केलेल्या चौघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
हांडे व त्याच्या साथीदारांनी निगडी, चिंचवड येथे प्रत्येकी एक असे दोन गुन्हे केले असून पुण्यात दोन गुन्हे केले आहेत. निगडीतील गुन्ह्यात त्यांनी चांदीची भांडी चोरुन नेली होती. या सर्व गुन्ह्यांमध्ये हांडे हा सर्व ठिकाणी होता तर अन्य आरोपी हे वेगवेगळ्या गुन्ह्यात हांडेबरोबर होते. कोथरुडमधील गुन्ह्यातच ते एकत्र आले होते. त्याच गुन्ह्यात ते पोलिसांच्या हाती सापडले.