वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
By Admin | Published: October 7, 2016 03:02 AM2016-10-07T03:02:44+5:302016-10-07T03:02:44+5:30
डीएचएफएल या फायनान्स कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजरपदावर काम करणाऱ्या एका विवाहितेने तिच्या वरिष्ठाच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना
पुणे : डीएचएफएल या फायनान्स कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजरपदावर काम करणाऱ्या एका विवाहितेने तिच्या वरिष्ठाच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील वारज्यामध्ये घडली. या विवाहितेच्या मोबाईलवर तिच्या वरिष्ठाने पाठवलेले अश्लील मेसेज पतीने मोबाईलसह पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात तिने पतीला आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने नोकरी सोडणार असल्याचे सांगितले होते. तब्बल एक महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले असून, वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अश्विनी महेंद्र पाटील (वय ३२, रा. प्रियदर्शनी विहार, वारजे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सूरज बुंदेले (पूर्ण नाव, पत्ता नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र अशोक पाटील (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे पती महेंद्र पाटील हे धनकवडी येथील एका खासगी संगणक कंपनीमध्ये नोकरी करतात, तर अश्विनी या डीएचएफएल कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजर म्हणून नोकरी करीत होत्या. आरोपी बुंदेले हा अश्विनी यांच्या कंपनीतील वरिष्ठ आहे. ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बेडरूममध्ये अश्विनी यांनी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर पाटील यांनी पत्नीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये सूरज बुंदेलेने अश्विनी यांना वारंवार फोन करून त्रास दिल्याचे समोर आले. (प्रतिनिधी)
विवाहितेचा मानसिक छळ : मोबाईलवर अश्लील मेसेज
४बेडजवळ त्यांना अश्विनी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये ‘मी अश्विनी महेंद्र पाटील स्वखुशीने फाशी घेत आहे, यात माझ्या घरच्यांचा, कुटुंबीयांचा काही दोष नाही. हीच विनंती आहे, की त्यांना कोणताच त्रास कोणीच देऊ नये,’ असे लिहून ठेवलेले होते. महेंद्र यांनी ही चिठ्ठी व मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला. ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
४दु:खातून तसेच मानसिक धक्क्यामधून सावरलेले पाटील यांनी बुधवारी रात्री वारजे पोलिसांकडे जाऊन फिर्याद दाखल केली.