येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:15 AM2022-03-25T11:15:19+5:302022-03-25T11:18:26+5:30
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या...
येरवडा (पुणे): येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. गणेश जगन्नाथ तांबे (वय 53) असे आत्महत्या केलेल्या बंदयाचे नाव असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा खुल्या कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या गणेश जगन्नाथ तांबे या कैद्याने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीने येरवडा पोलिसांना देण्यात आली होती. दरम्यान गणेश तांबे हा विरार पोलिस स्टेशन येथील 2010 मध्ये केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी होता.
वसई जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मे 2019 पासून ठाणे मध्यवर्ती कारागृह इथून येरवडा खुल्या कारागृहात त्याला दाखल करण्यात आले होते. खुल्या कारागृहातील स्वयंपाकगृह येथील काम त्याला देण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाचे काम उरकल्यानंतर बराक क्रमांक 2 येथे त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे इतर कैद्यांनी पाहिले.
खुल्या कारागृहाचे प्रभारी अधीक्षक जी.ए. मानकर यांनी तात्काळ या घटनेची माहिती कारागृह विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांना दिली. वैद्यकीय तपासणी पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. या आत्महत्येप्रकरणी येरवडा पोलिसांना माहिती देण्यात आली असून येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.
घटनास्थळी येरवडा कारागृहाच्या अधिक्षक राणी भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे यांनी भेट दिली. आत्महत्या केलेल्या बंदयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.