पुरंदर विमानतळाच्या धसक्याने केली आत्महत्या
By admin | Published: April 11, 2017 03:43 AM2017-04-11T03:43:54+5:302017-04-11T03:43:54+5:30
पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळासाठी आपली संपूर्ण जमीन जाऊन आपण उघड्यावर येणार असल्याच्या धास्तीने शंकर दौलती मेमाणे (वय ७७, रा. पारगाव मेमाणे,
जेजुरी : पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळासाठी आपली संपूर्ण जमीन जाऊन आपण उघड्यावर येणार असल्याच्या धास्तीने शंकर दौलती मेमाणे (वय ७७, रा. पारगाव मेमाणे, भगतवस्ती, ता. पुरंदर) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरी त्यांनी गोचीड मारण्याचे औषध प्यायले होते. थोड्या वेळाने त्यांना चक्कर आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना ससून येथे हलवण्यात आले होते. मात्र, तेथेही अत्यावश्यक सेवेत जागा नसल्याने पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळासाठी त्यांची जमीन जाणार असल्याने ते गेल्या अनेक महिन्यांपासून दडपणाखाली होते. दररोज वर्तमानपत्रे घेऊन विमानतळासंबंधातील बातम्यांची कात्रणे करीत होते. विमानतळाबाबत जेथून काही माहिती उपलब्ध होईल ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत होते. आयुष्यात जे कमावले ते जाणार या धास्तीने ते प्रचंड दडपणाखाली होते. यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांचे बंधू अंकुश दौलती मेमाणे, मुले शिवाजी शंकर मेमाणे व रामदास शंकर मेमाणे यांनी सांगितले. घटनेची आपण सखोल चौकशी करणार असल्याचे जेजुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रामदास वाकोडे यांनी सांगितले.