आजही हुंड्यासाठी आत्महत्या

By admin | Published: April 16, 2016 03:56 AM2016-04-16T03:56:05+5:302016-04-16T03:56:05+5:30

सासरच्या जाचाला कंटाळून दोन वर्षांत शहरामध्ये ४० नवविवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. यात २०१४मध्ये २६ विवाहिता, तर २०१५ मध्ये १४ विवाहितांनी आत्महत्या केल्या

Suicide for Dowry Today | आजही हुंड्यासाठी आत्महत्या

आजही हुंड्यासाठी आत्महत्या

Next

पिंपरी : सासरच्या जाचाला कंटाळून दोन वर्षांत शहरामध्ये ४० नवविवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. यात २०१४मध्ये २६ विवाहिता, तर २०१५ मध्ये १४ विवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. या वर्षीही २०१६मध्ये विवाहितांच्या अत्याचाराचा आलेख चढता असून, गेल्या तीन महिन्यांत सहा विवाहितांनी आत्महत्या केल्या. निगडी व
पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये सर्वाधिक विवाहितांच्या आत्महत्येची नोंद आहे.

परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या पोलीस ठाण्यांमध्ये दर आठवड्यात विवाहितेच्या अत्याचारासंदर्भात किमान एक तरी गुन्हा दाखल होत आहे. यामध्ये घर किंवा वाहन खरेदीसाठी माहेरून पैसे आणावे, लग्नात हुंडा दिला नाही म्हणून, लग्नानंतरही हुंड्याची मागणी करणे, लग्नात मानपान दिला नाही, किमती वस्तू दिल्या नाहीत, स्वयंपाक व्यवस्थित येत नाही आणि चारित्र्याचा संशय या कारणावरून विवाहितांचा छळ होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यात सर्वाधिक आत्महत्येची नोंद निगडी पोलीस ठाण्यात झाल्या आहेत.
दरम्यान, मागील आठवड्यातच मोशी येथे एका बावीसवर्षीय विवाहितेने घरगुती झालेल्या भांडणाच्या कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. तर चार दिवसांपूर्वीच एका ३२वर्षीय विवाहितेने लग्नात हुंडा दिला नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याची तक्रार निगडी ठाण्यात दिली आहे.
मूल होत नसल्याने आत्महत्या
मोशी येथे मागील आठवड्यात विवाहितेला मूल होत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळून २१वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर पंधरा दिवसांपूर्वी मोशी येथे विवाहितेला दोन मुली होत्या. मुलगा
होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
दरम्यान सासरच्या मंडळींकडून विवाहितांना विविध वस्तूंची रोख पैशांच्या स्वरूपातही मागणी केली जात आहे. ती पूर्ण न केल्यास शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे. त्यातूनच आत्महत्येसारख्या घटनांत वाढ होत आहे. या घटना वेळीच रोखण्यासाठी विवाहितेने संबंधितांवर तत्काळ तक्रारी दाखल करणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)

मुलीचा छळ पाहून पित्याची आत्महत्या
मागील महिन्यात मोशी येथे विवाहितेला सासरच्या मंडळींकडून घर घेण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत होती. यासाठी सासरच्यांनी विवाहितेला माहेरी पाठवून दिले होते. जोपर्यंत घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही, तोपर्यंत सासरी न येण्याची धमकी विवाहितेला दिली होती. अशा प्रकारे मुलीचा होणारा छळ आणि मुलीच्या सुखासाठी पैसे देण्याची परिस्थिती नसल्याने पित्यानेच राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होऊनही आरोपी मात्र मोकाटच आहेत.

आजच्या स्पर्धेच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने प्रगती केली आहे. असे असताना हुंड्याच्या मागणीसाठी व इतर किरकोळ कारणांवरून विवाहितांचा पतीकडून, सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होणे, ही वाईट गोष्ट आहे. या छळाला कंटाळून काही महिला पोलिसांत तक्रार देतात, तर काही आत्महत्या करण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतात. विवाहितांनी टोकाची भूमिका घेण्याआधी पोलिसांत तक्रार द्यावी. या तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस मित्र नावाचे मंडळ कार्यरत असून, या मंडळात विविध क्षेत्रांतील महिला सदस्य आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर या मंडळामार्फत विवाहितांच्या घरातील वाद, मतभेद सोडविण्याचा प्रयत्न केला जात असतो. गेल्या काही महिन्यांत अनेक विवाहितांच्या समस्या या मंडळामार्फत सोडविल्या गेल्या आहेत.- रत्नमाला सावंत, पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी

Web Title: Suicide for Dowry Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.