रोडरोमिओंना कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:22 AM2017-11-22T01:22:49+5:302017-11-22T01:23:11+5:30
जेजुरीतील एका शालेय विद्यार्थिनीने रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून आपल्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
जेजुरी : जेजुरीतील एका शालेय विद्यार्थिनीने रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून आपल्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नेहा संतोष कदम (वय १७, रा. कदमवस्ती, बेलसर, ता. पुरंदर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : आत्महत्या केलेली विद्यार्थिनी ही जेजुरी येथे एका महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असून, ती कदमवस्ती येथून जेजुरीला दररोज कॉलेजमध्ये येत होती. कदमवस्तीनजीकच्या गरुडवस्ती येथील किरण एकनाथ गरुड व राकेश भाऊसाहेब गरुड हे तरुण तिचा रोज जाता-येता मोटारसायकल, चारचाकी वाहनाने पाठलाग करीत होते. अश्लील हातवारे करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत होते.
आरोपी किरण गरुड तिचे फोटो काढून बदनामी करीत होता. या छेडछाडीला कंटाळून तिने दि. १५ नोव्हेंबर रोजी शेतातील पावट्याच्या पिकावर फवारणीस आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन केले. मुलीने विषारी औषध घेतल्याचे तिचे वडील संतोष कदम यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तिला येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. जेजुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली
आहे. त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२, तसेच विनयभंग व आत्महत्येस प्रवृत केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील करीत आहेत.