अकोले येथे विवाहितेची मुलीसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:31+5:302021-09-23T04:12:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : वंशाला दिवा असणारा मुलगा होत नाही म्हणून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळ आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : वंशाला दिवा असणारा मुलगा होत नाही म्हणून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळ आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून अकोले (ता. इंदापूर) येथील विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २१) घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा महादेव दराडे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. भाग्यश्री महादेव दराडे (वय ३, रा. अकोले, ता. इंदापूर) असे तिच्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील नवनाथ विठोबा खैरे (वय ६५, रा. दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी भिगवण पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या मंडळीविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव चंद्रकांत दराडे व रुपाली शरद खैरे (रा. दोघे अकोले, ता. इंदापूर) यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा तुला मुलगा होत नाही. त्यामुळे तुला सोडचिठ्ठी देणार, असे म्हणून पतीकडून मनीषाला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ होत होता. तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून मनीषा दराडे हिने मुलगी भाग्यश्री हिच्यासह अशोक यशवंत गायकवाड यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील करीत आहेत.