'माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त पती जबाबदार'; नवविवाहितेची ३ महिन्यात आत्महत्या
By विवेक भुसे | Published: September 14, 2022 03:49 PM2022-09-14T15:49:45+5:302022-09-14T15:50:08+5:30
लग्नानंतर केवळ ३ महिन्यात नवविवाहितेने आपले जीवन संपवले
पुणे : आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी व घरातील कामे करण्यासाठी तुझ्याबरोबर लग्न केले असल्याचे सांगून दुसऱ्या तरुणीबरोबर राहून मानसिक व शारीरीक छळ झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर केवळ ३ महिन्यात नवविवाहितेने आपले जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सत्यनारायण घनश्यामदास वैष्णव (वय २५, रा़ शहाद्र, छोटा बाजार, जुन्नी दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अरुणा सत्यनारायण वैष्णव (वय २६, रा. खराडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हा प्रकार १० जून ते १३ सप्टेबर २०२२ दरम्यान नवी दिल्ली येथे घडला.
याप्रकरणी सुगनादेवी गोपालदास रांका (वय ४६, रा. चौधरी वस्ती, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण व अरुणा यांचा विवाह १० जून २०२२ रोजी झाला होता. सत्यनारायण याचा दिल्लीत इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. त्याचे आईवडिल राजस्थानला राहतात. सत्यनारायण याचे बाहेर दुसऱ्या मुलीबरोबर संबंध होते. त्याविषयी अरुणा हिने विचारणा केली. तेव्हा सत्यनारायण याने तुझ्याबरोबर घरातील कामे करण्यासाठी व सासु सासरे यांचा सांभाळ करण्यासाठी लग्न केले असल्याचे सांगून हाताने मारहाण केली. तिला जेवण न देता, एकत्र न झोपता तिला बाल्कनीमध्ये झोपण्यास लावत.
श्रावण महिना सुरु झाल्याने तिच्या वडिलांनी अरुणा हिला पुण्यात माहेरी आणले. तिचे पतीबरोबर फोनवर बोलणे होत असे. तेव्हा त्याने मी तुला घेऊन जाण्यासाठी येणार नाही़ तू तुझे वडिलांसोबत माझे आई वडिलांचे घरी जा व त्यांची सेवा कर. मी तुझ्यासोबत राहणार नाही, असे म्हणून तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेऊन तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अरुणा हिने मंगळवारी सकाळी राहत्या घरासमोर असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे अधिक तपास करीत आहेत.
फक्त आणि फक्त पती जबाबदार
अरुणा आणि सत्यनारायण यांचे फोनवर बोलणे होत असे. तो आपल्या आईवडिलांची राजस्थानला जाऊन सेवा कर, असे तिला सांगत होता. त्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यानंतर अरुणा हिने चिठ्ठी लिहली. त्यात तिने आपल्या आत्महत्येस फक्त आणि फक्त पती हाच जबाबदार असल्याचे लिहून आत्महत्या केली.