CISF जवान आणि महिला काँस्टेबलची आत्महत्या; एकाचवेळी आत्महत्या केल्याने चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:17 PM2022-06-09T12:17:05+5:302022-06-09T12:22:07+5:30
दोघेही लोहगावातील गुरुद्वारा कॉलनीत राहत होते
पुणे : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवान व महिला काँस्टेबल यांनी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिता दास (वय ३०, मुळ रा. ओडिशा) आणि संजय कुमार (वय ३०, मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघेही लोहगावातील गुरुद्वारा कॉलनीत राहत होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता दास आणि संजय कुमार दोघेही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नियुक्तीला होते. विमानतळ सुरक्षेवर त्याची नेमणूक करण्यात आली होती. गुरुद्वारा कॉलनीत दोघेही वेगवेगळ्या घरात रहात होते. सोमवारी अस्मिता दास हिची मैत्रिणी तिला फोन करीत होती. परंतु, ती फोन उचलत नसल्याने ती दास हिच्या घरी आली. तरीही तिने दार न उघडल्याने पोलिसांना बोलावून दार उघडले असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
त्याचप्रमाणे संजय कुमार यांच्या घरातून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे त्याच्या शेजारच्यांनी कळविले़ त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडून आत पाहिले असता संजय कुमार यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. एकाचवेळी दोघा पोलीस काँस्टेबलानी आत्महत्या केल्याने चर्चेचा विषय झाला आहे. दोघांनीही चिठ्ठी अथवा काही लिहून ठेवले नसल्याने त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही़. विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.