आत्महत्येपासून परावृत्त करणारी ‘हेल्पलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:26+5:302021-09-11T04:11:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘मनोबल’ या परिवर्तन संस्थेच्या आत्महत्याविरोधी मोफत हेल्पलाइनला वर्षभरात ४०० पेक्षा अधिक कॉल आले आहेत. ...

Suicide Prevention Helpline | आत्महत्येपासून परावृत्त करणारी ‘हेल्पलाइन’

आत्महत्येपासून परावृत्त करणारी ‘हेल्पलाइन’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘मनोबल’ या परिवर्तन संस्थेच्या आत्महत्याविरोधी मोफत हेल्पलाइनला वर्षभरात ४०० पेक्षा अधिक कॉल आले आहेत. यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील संख्या जास्त आहे. फोनवरील समुपदेशन आणि नंतर गरजेनुसार भावनिक आधार आणि मनोविकारतज्ज्ञांची मदत घेऊन अनेक आत्महत्या टाळता येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

दरवर्षी महाराष्ट्रात १५ हजारांपेक्षा अधिक आत्महत्या होतात. कोरोनातील आर्थिक संकट, नोकरी, व्यवसाय, स्पर्धा परीक्षा, प्रेमात अपयश, एकलकोंडेपणा, न्यूनगंड, व्यसन, मानसिक आजार या कारणांमुळे आत्महत्येचे विचार मनात आल्याने हेल्पलाइनला संपर्क साधणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक सप्ताह म्हणून साजरा होतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मानसमैत्री विभाग आणि परिवर्तन संस्था दर महिन्याला एक याप्रमाणे पुढील वर्षभर मोफत आत्महत्या प्रतिबंधक मानसमैत्री प्रशिक्षक तयार करणार आहेत. तज्ज्ञ समुपदेशकांद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे. ऑनलाइन दोन तासांचे मोफत हे प्रशिक्षण घेतले जाणार असल्याचे परिवर्तन पुणेच्या समन्वयक रेश्मा कचरे यांनी सांगितले.

आतापर्यंत १५०० मानसमित्र आणि मैत्रिणींनी घेतलेय प्रशिक्षण

आतापर्यंत महाराष्ट्रभरात १५०० हून अधिक लोकांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. अधिकाधिक प्रशिक्षित मानस मित्र/ मैत्रिणी तयार झाले, तर आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापासून अनेकांना पहिल्या टप्प्यातच परावृत्त करता येईल. कोरोनासारख्या संकट काळात तर या समुपदेशकांना अधिकच महत्त्व प्राप्त होत आहे. शासन आणि स्वयंसेवी संस्था हेल्पलाइन चालवत असूनही जनजागृतीअभावी मदत पोहोचत नाही.

आत्महत्येविषयी मनात विचार येणे हे पाप किंवा लपवण्याची गोष्ट नसून अगदी कोणाच्याही मनात तणावाच्या प्रसंगी हे विचार येऊ शकतात. म्हणून अशावेळी प्रशिक्षित मानसमित्र आणि मैत्रिणींची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

कोणतीही आत्महत्या करण्याचा विचार करणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष कृती करण्याआधीच्या काही दिवसांत जवळच्या कोणत्या तरी व्यक्तीशी थेट किंवा अप्रत्यक्ष याविषयी बोललेली असते. त्यावेळी त्या व्यक्तीने योग्य पद्धतीने संवाद केला, तर तो खूपच महत्त्वाचा ठरतो. आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या अथवा तीव्र मानसिक त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीशी पहिल्या टप्प्यातच सुसंवाद साधून त्यांना कसे भावनिक प्रथमोपचार द्यावेत याविषयी हे प्रशिक्षण असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रशिक्षण घेतले, तर त्याचा कुटुंबाला आणि समाजाला फायदा होईल. असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

हेल्पलाइन क्रमांक : 74120 40300

--------------------------------------

Web Title: Suicide Prevention Helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.