पती व जावयाच्या त्रासाला कंटाळलेल्या ज्येष्ठ महिलेची आत्महत्या; धनकवडीमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 19:40 IST2021-05-14T19:40:04+5:302021-05-14T19:40:57+5:30
गेल्या तीन वर्षांपासून ते 29 मार्चपर्यंत महिलेला पती आणि जावई सर्व प्रॉपर्टी,राहते घर,बँकेतील पैसे, दागदागिने नावावर करण्यासाठी त्रास देत होते.

पती व जावयाच्या त्रासाला कंटाळलेल्या ज्येष्ठ महिलेची आत्महत्या; धनकवडीमधील घटना
पुणे : मृत्युनंतर सर्व प्रॉपर्टी, राहते घर, दागदागिने, आरडीएसचे पैसे
नावावर करण्याकरिता तगादा लावणाऱ्या पती व जावयाच्या त्रासामुळे एका ज्येष्ठ महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना धनकवडी येथील वनराई कॉलनी येथे घडली.
याप्रकरणी पतीसह जावयाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनुपमा अशोक लेले (वय ६७, रा. वनराई कॉलनी, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अशोक दिगंबर लेले (रा. वनराई कॉलनी, धनकवडी) तसेच जावई नितीन नंदकुमार डहाळे (रा. जिनस टॉवर्स, रास्ता पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुपमा लेले यांचे बंधू बाळकृष्ण आगाशे (वय ७०, रा. वनराई कॉलनी, धनकवडी) यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ते 29 मार्चपर्यंत अनुपमा यांना मेहुणे अशोक आणि त्यांचा जावई नितीन डहाळे त्रास देत होता. राहते घर, दागदागिन्यांची विक्री करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. डहाळे याने ठेवीचे पैसे त्याच्या पत्नीच्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. अनुपमा यांची राहते घर विकण्याची अजिबात इच्छा नव्हती. डहाळे दडपण आणण्यासाठी त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. पती आणि जावयाने दिलेल्या त्रासामुळे बहीण अनुपमा यांनी ३० मार्च रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान तिचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला असल्याचे अनुपमा यांचे बंधू बाळकृष्ण आगाशे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. केंजळे तपास
करत आहेत.
---