नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:00+5:302021-09-15T04:16:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : औंध येथील प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेने चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : औंध येथील प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेने चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून या नवविवाहितेने अवघ्या सहा महिन्यांतच आपले आयुष्य संपविले. राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मालविका सौरभ भादुरी (वय ३२, रा. ट्वीन टॉवर, वेस्टर्न मॉलमागे, औंध) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. ही घटना ९ सप्टेंबरला औंधमध्ये घडली. याप्रकरणी मालविका यांची आई नीना रजनीराम कुलुर (वय ५९, रा. सोजास आनंद पार्क, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसानी सौरभ शेखर भादुरी (३०, रा. ट्वीन टॉवर, औंध) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सौरभ हा प्रसिद्ध महिला चित्रकार माधुरी भादुरी यांचा मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालविका आणि सौरभ यांची अगोदर ओळख होती. दोन्ही घरांतील लोकांच्या मान्यतेने त्यांचा मार्च २०२१ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांत सौरभ मालविका हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊ लागला. त्यावरून तो तिला मानसिक व शारीरीक त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून ९ सप्टेंबरला मालविका हिने राहत्या घरी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. सौरभ भादुरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार अधिक तपास करत आहेत.