आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Published: February 26, 2017 03:32 AM2017-02-26T03:32:47+5:302017-02-26T03:32:47+5:30
नीरानजीकच्या लोणंद-पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता आश्रमशाळा येथील दहावीच्या विद्यार्थिनीने खिडकीच्या गजाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नीरा : नीरानजीकच्या लोणंद-पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता आश्रमशाळा येथील दहावीच्या विद्यार्थिनीने खिडकीच्या गजाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, की शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास अक्षता लक्ष्मण पढेर (वय १६, रा. पर्वती, जनता वसाहत, पुणे, सध्या राहणार आश्रम शाळा) या विद्यार्थिनीने वसतिगृहातील राहत्या खोलीतील खिडकीच्या गजाला ओढणी गुंडाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची खबर दीपक वाघमारे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, की अक्षता पढेर ही गेली तीन वर्षांपूर्वी आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता ८ वी मध्ये दाखल झाली होती.
अक्षता हिने आपल्या खोलीतील तिची धाकटी बहीण अंकिता हीस अंघोळीला पाठवले आणि तिच्या मैत्रिणीला खोलीमध्ये साफसफाई करायची आहे, खाली जाऊन झाडू घेऊन ये, असे सांगितले. खोलीला आतून कडी लावली. तिची धाकटी बहीण व मैत्रीण वर येऊन बाहेरून हाका मारून बराच वेळ झाला, तरी अक्षता दार उघडत नाही, म्हणून शिक्षकांना बोलावले. दरवाजाची कडी धक्के मारून तोडली असता अक्षताने खिडकीच्या गजाला ओढनी बांधून गळफास घेतला असल्याचे आढळून आले. ती जागेवरच मृत्युमुखी पडली होती. घटनास्थळी सहायक आयुक्त समाजकल्याण सातारा एच. डी. डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिचे शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
- आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी गेली असता तिला लवकर गरम पाणी पाहिजे होते. परंतु सहकारी मुलींनी तिला दिले नाही आणि अक्षताला राग आला. ती रडतच तिच्या खोलीत गेली व त्यानंतर तिने आत्महत्या केली.