धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीचा योग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 02:09 AM2018-11-05T02:09:54+5:302018-11-05T02:10:18+5:30
लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने झगमगणाऱ्या प्रकाश पर्वाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला़ वसुबारसनिमित्त शहरातील विविध ठिकाणी गायींची मनोभावे पूजा करून गृहिणींनी या प्रकाशपर्वाचा पहिला दिवा लावला.
पुणे - लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने झगमगणाऱ्या प्रकाश पर्वाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला़ वसुबारसनिमित्त शहरातील विविध ठिकाणी गायींची मनोभावे पूजा करून गृहिणींनी या प्रकाशपर्वाचा पहिला दिवा लावला़
वसुबारसनिमित्त शनिवारवाड्यावर चैतन्य हास्य क्लबच्या वतीने हजारो दिव्यांच्या साक्षीने दीपोत्सव साजरा केला. सोमवारी धनत्रयोदशीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले. सातारा रोडवरील विश्वानंद केंद्रात धन्वंतरीचे पूजन करून महायज्ञ करणार आहे़ धनत्रयोदशीनिमित्त अनेक जण सोन्या-नाण्याची खरेदी करतात़
६ नोव्हेंबरला नरकचतुर्दशी असून, सत्याचा असत्यावर विजय मिळविण्याचा हा दिवस़ नरक चतुर्दशीला ब्राह्म मुहूर्तावर सूर्योदयापूर्वी अभंग्यस्नान करण्याची परंपरा आहे़ नरकचतुर्दशीला शहरात विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ ७ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असून, आश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी रात्रभर सर्वत्र संचार करत असते. या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते़ ८ नोव्हेंबरला पाडवा अर्थात बलिप्रतिपदा़ बळीराजाची पूजा या दिवशी करतात़ या दिवशी विक्रम संवत्सर सुरू होते़ व्यापारी आपल्या हिशोबाच्या वह्याची पूजा करतात़ ९ नोव्हेंबरला भाऊबीजेनिमित्त बहिण भावाला औक्षण करते़