सुमन कल्याणपूर यांना पु. ल. स्मृती सन्मान जाहीर; ९ नोव्हेंबरला होणार गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:19 PM2017-11-03T19:19:21+5:302017-11-03T19:24:02+5:30
यंदाचा पु. ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे : चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांचा अभिजात अविष्कार आणि पु.ल.बद्दलचा आदर व्यक्त करणारा व सर्वाधिक काळाप्रकारांना स्पर्श करणारा एकमेव महोत्सव म्हणजेच पुलोत्सव. यंदाचा पु. ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे.
त्यांच्या भावमधूर व स्वरेल कारकिर्दीच्या सन्मानार्थ व ८० च्या पदार्पणाच्या निमित्ताने या वर्षीच्या पुलोत्सवामध्ये पु. ल. स्मृती सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या क्षेत्रात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते अशा ज्येष्ठ गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर. आपल्या सुमधुर गायिकेने रसिकांच्या मनांवर त्यांनी अधिराज्य गाजविले. चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील आघाडीच्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली एकाहून एक दजेदार गीते अजरामर आहेत. हिंदीप्रमाणेच मराठी, आसामी, गुजराथी, कन्नड, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, उरीया, तसेच पंजाबी भाषेत गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेल्या भावगीतांची मोहिनी आजही रसिकांच्या मनांवर कायम आहे. आजवर अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.