आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीचे पीक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:29+5:302021-05-11T04:10:29+5:30
उन्हाळ्यातील उत्तम हवामान व डिंभे धरणातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारे पाणी यामुळे आंबेगाव तालुक्यात सध्या उन्हाळी बाजरीचे पीक घेण्याकडे ...
उन्हाळ्यातील उत्तम हवामान व डिंभे धरणातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारे पाणी यामुळे आंबेगाव तालुक्यात सध्या उन्हाळी बाजरीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
तालुक्याच्या पूर्वभागासह डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पश्चिम भागातही उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असल्याचे चित्र सध्या आंबेगाव तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
आंबेगाव तालुक्यात पूर्वभागासह आदिवासी भागातील पाणलोट क्षेत्रातही उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्याचे पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्यामधील उत्तम हवामान व डिंभे धरणाच्या माध्यमातून पिकासाठी उपलब्ध होणारे मुबलक पाणी यामुळे या तालुक्यातील शेतकरी उन्हाळी बाजरीच्या पिकाकडे वळला असल्याचे गेल्या काही वर्षांपासून पाहावयास मिळत आहे. बाजरीचे पीक तयार होण्यास जेमतेम तीने चार महिने लागतात.
फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान शेतात घेतलेले बाजरीचे पीक साधारणत: मे महिन्यापर्यंत तयार होते. या पिकाची काढणीही पावसाळ्यापूर्वी होत असल्याने पिकाची काठणी व मळणी करणे सोपे जाते.
तालुक्यातील काही शेतकरी तर सध्या उन्हाळी बाजरीचे पीक व्यापारी तत्त्वावर घेऊ लागले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बाजरीला मोठी मागणी असते. शेतात पिकविलेल्या धान्यापैकी कुटुंबाला आवश्यक असणारे धान्य राखून ठेवून उर्वरित बाजरीची विक्री केली जाते. यामुळे उन्हाळी हंगामात पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खत व मजुरीसाठी आलेला खर्चही वरचेवर निघत असून धान्याबरोबर दोन पैसेही उपलब्ध होत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकरी सध्या उन्हाळी बाजरीच्या पिकाकडे वळला असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सध्या तालुक्याच्या पूर्वभागातील मंचर, निरगुडसर, अवसरी, नारोडी, घोडेगाव, शिनोली, महाळुंगे, कळंब, आमोंडी, गंगापूर, शिनोली, कानसे, डिंभे, सुपेधर या भागातील शेतकऱ्यांबरोबरच तालक्याच्या पश्चिम भागातील गोहे, फुलवडे, अडिवरे, बोरघर, कोकणेवाडी, वचपे, पाटण, कुशिरे, बेंढारवाडी या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनीही उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले असल्याचे पाहावयास मिळत आहे.
--
सोबत - डिंभे बाजरीचे पीक
ओळी- आंबेगाव तालुक्यात जोमात वाढलेले बाजरीचे पीक.