यंदाचा उन्हाळा अधिक कडक, निवडणूक प्रचारात अडसर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:05 AM2019-04-02T06:05:47+5:302019-04-02T06:06:11+5:30
प्रचारात अडसर; सरासरी ०़५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता
पुणे : यंदा एप्रिल ते जून या हंगामात मध्य भारत आणि उत्तर पश्चिम भारतात सरासरीपेक्षा ०़५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ पश्चिम राजस्थानमध्ये हंगामातील सरासरीपेक्षा १ अंशाने तापमान जास्त असण्याची शक्यता आहे़ तसेच उष्ण झोनमध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे़ मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी या हवामान विभागाच्या उपविभागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता ४४ टक्के आहे़ कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश भागात उमेदवारांना प्रचार करताना कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे.
भारतीय हवामान विभागामार्फत २०१६ पासून हंगामातील हवामानाचा दर तीन महिन्यांचा अंदाज देण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार एप्रिल ते जूनमधील हंगामातील तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाने जाहीर केला आहे़ त्यानुसार उत्तर, उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतातील हवामानाच्या उपविभागाव्यतिरिक्त अन्य हवामान विभागात दिवसाचे व रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते १ अंशाने अधिक राहणार आहे़ हरियाना, चंदीगड, दिल्ली, पश्चिम व पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम व पूर्व राजस्थान, पश्चिम व पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक किनारपट्टी, उत्तर कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तेलंगणा या विभागात तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे़ तर अन्य विभागात तापमान सर्वसामान्य राहील़
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तापणार
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात एप्रिल, मे व जून महिन्यात कडक उन्हाळा असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़