उन्हाळ्यात तरणतलाव बंदच
By admin | Published: March 22, 2017 03:19 AM2017-03-22T03:19:32+5:302017-03-22T03:19:32+5:30
ऐन निवडणुकीच्या तोंडावर जानेवारी २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात पिंपरीगाव आणि संभाजीनगर येथील जलतरण तलावांचा
पिंपरी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर जानेवारी २०१७ च्या शेवटच्या आठवड्यात पिंपरीगाव आणि संभाजीनगर येथील जलतरण तलावांचा उद्घाटन समारंभ उरकण्याची घाई केली. निवडणूक होऊन गेली, तरी अद्याप हे दोन्ही जलतरण तलाव सुरू होऊ शकले नाहीत. उन्हाळयात पाण्याची टंचाई जाणवू लागताच, पाणीकपातीचे धोरण अवलंबले जाते. त्याचाच एक भाग म्हणून उन्हाळ्यात आहे ते तलाव बंद ठेवले जातात. अशा परिस्थितीत नव्याने साकारलेले जलतरण तलाव उन्हाळ्यात खुले होतील, ही नागरिकांची आशा मावळली आहे.
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जलतरण तलावाचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण केले आहे. हा तलाव नूतनीकरणानंतरही अधूनमधून बंद ठेवला जातो. यमुनानगर आणि प्राधिकरण येथील जलतरण तलाव वारंवार विविध कारणास्तव बंद ठेवले जातात. कासारवाडीतील जलतरण तलावाची स्थिती अशीच आहे. सांगवी आणि चिंचवडगावातील तलाव मात्र नियमितपणे सुरू असतो. नेहरूनगर, यमुनानगर आणि प्राधिकरणातील तलाव वारंवार बंद ठेवले जात असल्याने तेथील पासधारक मोहननगरच्या तलावावर येतात. दोन्ही तलावांत नियमित पोहणारे नियमित सदस्य पर्याय म्हणून मोहननगरच्या तलावात येऊ लागल्याने या तलावावरील ताण वाढला आहे. मोहननगर येथील तलावाच्या फरशा तुटल्या आहेत. दुरूस्तीची अनेक कामे करावी लागतील. अशी परिस्थिती आहे. अशातच या तलावात क्षमतेपेक्षा अधिक लोक हजेरी लावू लागले आहेत. शाळांना सुटी पडल्याने पोहोण्यास शिकविण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
संभाजीनगर येथील जलतरण तलाव खुला केल्यास मोहननगर तलावावरील गर्दी कमी होऊ शकेल. नविन ोला संभाजीनगर येथील तलाव वापरात येईल. असे असताना उद्घाटनानंतर एक महिना उलटला तरी तलाव का खुला केला जात नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. उन्हाळ्यात तलाव सुरू असणे गरजेचे असते. मात्र ऐन उन्हाळ्यातच महापालिकेकडून तलाव बंद ठेवले जातात. वर्षाचे तसेच सहा महिन्यांचे शुल्क भरून जे सदस्य नियमित पोहण्यासाठी येतात. त्यांना त्या पूर्ण कालावधीत पोहोण्याची सुविधा उपलब्ध होत नाही. दुरुस्तीच्या आणि पाणीकपातीच्या सबबीखाली तलाव बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होते. क्षमतेपेक्षा अधिक लोक मोहननगरच्या तलावात पोहण्यासाठी येऊ लागल्याने लवकरच हा तलावही दुरुस्तीकामी बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. बीआरटी मार्ग बससाठी नाही, पण दुचाकींसाठी तरी खुला केला तशाच पद्धतीने तलाव खुले करावेत.