अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:39 PM2018-04-12T16:39:24+5:302018-04-12T16:41:00+5:30
पुण्यातील सेवा मित्र मंडळाच्या वतीने अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर घटविण्यात येणार अाहे. अनाथ मुलांना पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार अाहेत. तसेच या मुलांसाठी विविध मनाेरंजनाचे कार्यक्रमही अायाेजित करण्यात येणार अाहेत.
पुणे : शाळांना सुट्ट्या लागल्या की मुलांना मामाच्या गावाला जायची अाेढ लागते. मामाच्या गावाला जाऊन धमाल, मस्ती करण्याचा बेत अाखला जाताे. मात्र वंचित तसेच विशेष मुलांना या अानंदापासून वंचित रहावे लागते. अशाच अनाथ मुलांना मामाच्या गावाची सफर पुण्यातील सेवा मित्र मंडळ घडविणार अाहे. त्याचबराेबर दृष्टीहीन भगिनींचा विवाह साेहळ्याचे सुद्धा अायाेजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष वैभव वाघ यांनी दिली.
मामाच्या गावच्या सफरीची सुरूवात गुरुवार, दिनांक १९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता होणार असून या दिवशी भाचे मंडळींचे स्वागत होणार आहे. हत्ती, उंट, घोडे, मिकी माऊस हे भाचे मंडळीच्या स्वागताला येणार आहेत. यासोबतच त्यांच्यासाठी इक्बाल दरबार यांचा गॉड गिफ्ट हा सांगितीक कार्यक्रम आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. भाचे मंडळीना पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे देखील दाखविण्यात येणार आहेत.
वैभव वाघ म्हणाले, शहरातील अनाथ आश्रमातील मुले-मुली मामाच्या गावच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आतुरतेने वाट पहातात. दोन ते तीन दिवस भाचे मंडळी मुक्कामी असतात. अनाथ आणि विशेष मुलांना मामाच्या गावी येऊन सुट्टीमध्ये मजा करता यावी यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. पुण्यातील श्रीवत्स, बचपन घर फोरम, संतुलन, एकलव्य न्यास. फुलवा, आपलं घर आदी संस्थातील मुले सहभागी होणार आहेत.
मंडळातर्फे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या दोन अंध भगिनींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यांना पुढील जीवनासाठी संसारोपयोगी साहित्याची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक संख्येने लोकांनी त्यांना मदत करावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.