कर्जमाफीच्या बहाण्याने सासऱ्याची जमीन विकून जावई गेला बँकॉकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 08:26 PM2018-03-24T20:26:51+5:302018-03-24T20:26:51+5:30
दोन महिन्यांपूर्वी संतोष कामठे याने सरकारने कर्जमाफी केली असून त्यासाठी तुमचे अंगठे, फोटो घ्यायचे आहेत, असे सांगून सासवड येथे मुलीच्या नावे (स्वत:च्या पत्नीच्या ) कुलमुखत्यार पत्र करून घेतले.
जेजुरी : सरकारने कर्जमाफी केलेली असून, त्यासाठी तालुक्याला जाऊन फोटो काढून अंगठे करून फॉर्म भरावा लागतो. तुम्ही व तुमचा मुलगा अशिक्षित आहेत, तुम्हाला काही कळणार नाही, असे सांगून एका वृद्ध दाम्पत्याला व त्यांच्या विवाहित मुलीला सासवड येथे नेऊन कुलमुखत्यारपत्र करून घेत परस्पर जमीन-विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हे कृत्य जावयानेच केले असून तो बँकॉकला पळून गेल्याचे समोर आले आहे.
दोन महिन्यांपूर्वी हा व्यवहार झाला आहे. किसन आबू चोभे-चव्हाण, सौ. गंगुबाई किसन चोभे -चव्हाण (रा. पांडेश्वर, ता. पुरंदर) अशी त्या वृद्ध दाम्पत्याची नाव असून जावई संतोष सर्जेराव कामठे (रा. वणपुरी) तसेच त्याचे खरेदीदार व सहकारी अमोल संपत वांढेकर, संदीप संपत वांढेकर, (दोघेही रा. भिवडी, ता. पुरंदर), पांडूरंग दत्तात्रेय झिंजुरके, पांडुरंग चंद्रकांत झिंजुरके (दोघेही रा. भिवरी. ता. पुरंदर) आणि दीपक रमेश मांढरे, सूर्या नाईक जरुप्ता (दोघेही रा. सासवड, ता. पुरंदर)यांच्याविरोधात सासवड पोलीस ठाण्यात धाव घेत सदर प्रकाराची चौकशी होऊन न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सासवड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जानुसार, पांडेश्वर येथील किसन चोभे-चव्हाण व गंगुबाई चोभे-चव्हाण यांची गट क्र.८४५ मध्ये दोन एकर शेतजमीन असून त्यांच्या नावे ७/१२ उताऱ्यावर नोंद असली तरी त्यांचा मुलगा नंदकुमार हा कसत आहे. शेतात चिकू व सीताफळाची बाग आहे. किसन चोभे व त्यांची वृद्ध पत्नी गंगुबाई, मुलगा, विवाहित मुलगी अशिक्षित असून किसन चोभे यांना वृद्धापकाळाने डोळ्यांनी नीटसे दिसत नाही व ऐकूही येत नाही. दोन महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी मनीषा हिच्या पती संतोष कामठे याने सरकारने कर्जमाफी केली असून त्यासाठी तुमचे अंगठे, फोटो घ्यायचे आहेत, असे सांगून सासवड येथे मुलीच्या नावे (स्वत:च्या पत्नीच्या ) कुलमुखत्यार पत्र करून घेतले. त्यानंतर चारच दिवसांनी जमिनीच्या विक्रीचा व्यवहार करण्यात आला. या व्यवहाराची माहिती संबधित जावयाची पत्नी अशिक्षित असल्याने तिलाही आपला पती फसवणूक करीत असल्याची काहीच कल्पना आली नाही. आठ दिवसांपूर्वी किसन चोभे यांचा मुलगा नंदकुमार तलाठी कार्यालयात ७/१२ उतारा काढण्यासाठी गेला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आणि त्यानंतर आपल्या पतीचा प्रताप मुलीला समजला.
वृद्ध दाम्पत्य, मुलगा, मुलगी यांनी सासवड पोलीस ठाण्यात धाव घेत जावई व त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. सदरचे जावईबापू हे जमीन खरेदी-विक्रीतील एजंट असून त्यांना दारूचे, बाहेरख्यालीपणाचा नाद असल्याचे व ते सध्या जमीन खरेदी केलेल्या व्यक्तींबरोबर बँकॉक येथे परदेशवारीला गेल्याचे तक्रार अर्जात नमूद करीत जावई व त्यांच्या साथीदारांनी एक रुपयाही मोबदला न देता फसवणूक करून दांडगाईने, मनगटशाहीने जमीन हडप केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम्हाला जगणे अवघड होणार आहे. सदरील प्रकरणाची चौकशी करून, फसवणुकीच्या प्रकारात सामील असलेल्या इसमांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधून वृद्ध दाम्पत्यासह परिवाराने फसवणूक झाल्याची हकीकत कथन केली. या प्रकरणात स्वत: लक्ष घालून चौकशी करणार असल्याचे अण्णासाहेब जाधव यांनी सांगत चोभे परिवाराला दिलासा दिला आहे.
या प्रकाराबाबत तहसीलदार सचिन गिरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही चौकशी करून जे या घटनेत सामील व दोषी असतील त्यांचेवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.