सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकिटे विकणाऱ्याला मुंबईत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 09:36 PM2018-03-12T21:36:29+5:302018-03-12T21:36:29+5:30
उंड्री येथील एकाने फेसबुकवर असलेल्या सनबर्न पेजवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करुन ५ तिकीटे खरेदी केली होती़.
पुणे : सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकीटे विकणाऱ्या तरुणाला सायबर सेलने मुंबईतून अटक केली आहे़. मोहम्मद हुजेफा हनीफ घराडे (वय १८, रा़ सारा अपार्टमेंट, नालासोपारा, पालघर) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याकडून २ मोबाईल, ४ सिमकार्ड, १ डिबिट कार्ड, २ पेनड्राईव्ह, १ लॅपटॉप, १ सनबर्नचे कार्ड असा माल जप्त केला आहे़ .
उंड्री येथील एकाने फेसबुकवर असलेल्या सनबर्न पेजवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करुन ५ तिकीटे खरेदी केली होती़. त्यासाठी त्यांनी १८ हजार रुपये पेटीएमद्वारे ट्रान्सफरही केले़. प्रत्यक्ष कार्यक्रमाला गेल्यावर त्यांना ही तिकीटे बोगस असल्याचे सांगण्यात आले़. त्यावरुन त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली होती़. या गुन्ह्याचा सायबर सेलमार्फत समांतर तपास सुरु असताना दिलेल्या मोबाईलवरुन तो नालासोपारा पश्चिम येथे असल्याची माहिती मिळाली़.पोलिसांनी तेथे जाऊन मोहम्मद घराडे याला पकडले़.पुढील कार्यवाहीसाठी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे़.
ही कामगिरी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, उपनिरीक्षक मंदा नेवसे, यांच्या पथकाने केली़ सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकीटे देऊन कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़.