‘सनबर्न’ने परवानगी घेताना केली दिशाभूल; मुळशीतील लवळे ग्रामसभेत ना हरकत प्रमाणपत्र रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:32 PM2017-12-16T12:32:37+5:302017-12-16T12:35:23+5:30
पुणे जिल्ह्यामध्ये गाजत असलेले व सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला ‘सनबर्न’ या कार्यक्रमास मुळशी तालुक्यामधून चांगल्याच प्रकारे विरोध सुरू झालेला आहे.
पिरंगुट : सध्य परिस्थितीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये गाजत असलेले व सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला ‘सनबर्न’ या कार्यक्रमास मुळशी तालुक्यामधून चांगल्याच प्रकारे विरोध सुरू झालेला आहे. बावधन, हिंजवडी पाठोपाठ आता लवळे गावचे ग्रामस्थ ही एकवटले आहेत.
लवळे (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामसभा घेतली होती. त्यामध्ये सनबर्गच्या आयोजकांनी लवळे ग्रामपंचायतीची दिशाभूल करून ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले होते. परंतु ते ना हरकत पत्र आम्ही रद्द केलेले आहे, अशी माहिती लवळे गावच्या सरपंच विद्या क्षीरसागर यांनी दिली. पण कंपनीने जरी बळजबरीने हा कार्यक्रम घेतल्यास आत्मदहनाचा व आंदोलनाचा इशारा ही ग्रामस्थांच्या वतीने या ग्रामसभेमध्ये देण्यात आला. त्यानुसार या ग्रामसभेमध्ये ‘सनबर्न’ या कार्यक्रमाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमस्थळी भेट देऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या तयारीसाठी चालु असलेली सर्व कामे बंद पाडली.
विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुणे शहराजवळ २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये मुळशी तालुक्यामधील लवळे व बावधन गावाच्या सीमेवर होत असल्याने कथित ‘सनबर्न’ या कार्यक्रमाच्या विरोधामध्ये लवळेचे संपूर्ण ग्रामस्थ एकवटले असून या कार्यक्रमाला लवळे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आलेला आहे. यासाठी नुकतेच ग्रामपंचायतीच्या वतीने रोटमलनाथ मंदिरामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
लवळे (ता. मुळशी) येथील आॅक्सफोर्ड गोल्फ क्लब रिसॉर्ट येथे सनबर्ग हा कार्यक्रम होत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या शहरात विरोध झाल्याने बावधन व लवळे गावच्या सीमेवर हा कार्यक्रम होत आहे. यासाठी मुंबई येथील मे. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लवळे ग्रामपंचायतीकडे दिनांक ४ डिसेंबर २०१७ रोजी संगीतमय कार्यक्रम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ग्रामपंचायतीने मिळालेल्या अजार्नुसार संगीतमय कार्यक्रम आहे म्हणून ना हरकत प्रमाणपत्र दिले
में. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ‘सनबर्न’ नावाचा कलंकित कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यास सर्व पुणे जिल्ह्यातून सर्व क्षेत्रातून विरोध आहे. लवळे ग्रामपंचायतीने हा कार्यक्रम होण्यासाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली होती. तसेच या कार्यक्रमास विरोध करण्यासाठी ग्रामसभा विशेष ग्रामसभा आयोजित करावी असा अर्ज ६ डिसेंबर २०१७ रोजी दिला होता.
यासंदर्भात सरपंच विद्या क्षीरसागर व उपसरपंच वैभव कुदळे यांनी सांगितले, की में. पर्सेंट लाइव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केलेल्या अर्जात ‘सनबर्न’ कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. केवळ संगीतमय कार्यक्रमासाठी परवानगी पाहिजे, असे लिहले होते. त्यामुळे कंपनीने ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याचे लक्षात आल्याने विशेष ग्रामसभा घेऊन दिलेले ना हरकत प्रमाणपत्र सवार्नुमते रद्द करण्यात आले आहे.