सनबर्नने पोखरलाय डोंगऱ़!
By admin | Published: December 24, 2016 12:18 AM2016-12-24T00:18:04+5:302016-12-24T00:19:01+5:30
केसनंद (ता. हवेली) येथे दि. २८ ते ३१ डिसेंबर सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचा घाट घातला असून गट नं. ६० व इतर गटात
कोरेगाव भीमा : केसनंद (ता. हवेली) येथे दि. २८ ते ३१ डिसेंबर सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचा घाट घातला असून गट नं. ६० व इतर गटात मोठ्या प्रमाणावर उत्खनन व वृक्षतोड झालेली आहे. वनविभागाने कोणतीही परवानगी दिलेली नसताना हे प्रकार बिनबोभाट सुरू आहेत. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे, वृक्षतोड झालीच नसल्याचा आश्चर्यजनक खुलासा वनविभागच करीत आहे.
फेस्टिव्हलच्या आयोजनासाठी जोगेश्वरी मंदिराच्या डोंगरावर बाऊन्सर्स व सुरक्षारक्षक तैनात केले असून पर्यटनासाठी जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या दमबाजीला सामोरे जावे लागत आहे. शिवसेना युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख विपुल शितोळे यांनी यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
केसनंद व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान जोगेश्वरीमातेचे जागृत देवस्थान डोंगरावर आहे. मंदिराच्या मागील फेस्टिव्हलचे आयोजन केले असून तिथे फेस्टिव्हलची जय्यत तयारी चालू आहे. त्यासाठी वनविभागाच्या जागेतून रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्यासाठी ३ मीटरची परवानगी असताना जवळपास ३० फुटांपेक्षा जास्त रस्ता बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले आहे.
जोगेश्वरीमातेच्या पवित्र डोंगरावर नशेच्या धुंदीत व मादक पदार्थांचे सेवन करून कार्यक्रम होणार असल्याने या फेस्टिव्हलला शिवसेना, मनसे, माहिती सेवा समिती, हिंदू जनजागृती समिती, तसेच हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. पुण्यातही या फेस्टिव्हलविरोधात आंदोलन झाले आहे. विरोध लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.