रविवार पेठेत भरदुपारी दरोडा, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 10:08 PM2018-02-21T22:08:26+5:302018-02-21T22:08:50+5:30
रविवार पेठेतील पायल गोल्ड या सोन्याच्या होलसेल सराफी दुकानात पाच चोरट्यांनी शिरून दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून ७०० ग्रॅम सोने व ३० हजार रुपये, दोन मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला.
पुणे : रविवार पेठेतील पायल गोल्ड या सोन्याच्या होलसेल सराफी दुकानात पाच चोरट्यांनी शिरून दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून ७०० ग्रॅम सोने व ३० हजार रुपये, दोन मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या दुकानाच्या शेजारील दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. दरोड्याचा हा प्रकार रविवार पेठेतील रेल्वे आरक्षण केंद्रासमोरील गल्लीतील नंदन टेरेस या इमारतीच्या तळमजल्यावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. गुन्ह्याचे स्वरुप पाहता चोरट्यांनी अगोदर रेकी करून हा दरोडा टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, पोलिसांना हा दरोडा टाकणा-यांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
या प्रकरणी मनोज जैन (वय ३६, रा. मार्केटयार्ड) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज जैन यांचे भागीदारीत नंदन टेरेस या इमारतीच्या तळमजल्यावर पायल गोल्ड हे सराफी दुकान आहे. या दुकानाच्या शेजारील इमारतीत त्यांचे दागिने घडविण्याची रिफायनरी आहे. पायल गोल्ड हे छोटेसे दुकान असून त्यात होलसेल व्यापार चालतो. मुंबईहून सोने आणून सराफ दुकानदार, सुवर्णकार यांना ते विकतात. बुधवारी दुपारी सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास मनोज जैन हे दुकानात एकटेच होते. त्यावेळी साधारण २५ ते ३० वयाच्या चौघा जणांनी चालत चालत येऊन इमारतीत प्रवेश केला. त्यांनी दुकानात प्रवेश करून त्यांच्यातील एकाने आपल्या कमरेला लावलेले दोन कोयते काढले. त्यातील एक दुस-याकडे दिला. त्यावेळी बाहेरून एकाने शटर ओढून घेतले. एक जण कोयता उगारून जैन यांच्यासमोर उभा राहिला.
दुस-याने काऊंटरच्या कडेने आत येऊन डॉव्हरमधील सोन्याची बिस्किटे व रोकड बाहेर काढली़ तिस-याकडे असलेल्या बॅगेत ही ऐवज भरला आणि ते काही मिनिटातच पुन्हा शटर उघडून निघून गेले. घाईघाईत जाताना त्यांनी रुमाल व कोयते तेथेच टाकून पळ काढला. बाहेर ते पळत पळत आले. त्यांच्या पाठोपाठ मनोज जैन हे आले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने कोयता फेकून मारला व तो त्यांनी तो चुकविला. आले तसे गल्लीतून बाहेर पडून दोन दिशांना ते दोघे पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. जी. अंबुरे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वान पथकाने चोरट्यांनी तेथेच टाकलेल्या रुमालावरून काही अंतरापर्यंत त्यांचा माग काढला. त्या ठिकाणाहून ते वाहनात बसून पळून गेले असावेत, असा अंदाज आहे.
नंदन टेरेट ही इमारत अतिशय आतल्या बाजूला असून बाहेरून तेथे असा काही व्यवसाय सुरू असेल, याची इतरांना कल्पना सुद्धा येणार नाही. त्यामुळे चोरट्यांनी रेकी करून त्यानंतर हा दरोडा टाकला असल्याचा संशय आहे. पायल गोल्ड हे दुकान छोट्याशा गाळ्यामध्ये आहे. या दुकानाच्या बाहेरच पाण्याचा नळ आहे. त्या ठिकाणी अनेक कामगारांची हात धुण्यासाठी येजा असते. त्यामुळे तेथे येणा-यांकडे इतरांचे लक्ष जाऊ शकत नाही. चोरट्यांनी आत शिरताच बाहेरच्याने शटर खाली ओढून बंद करून घेतल्याने इतरांना आत काय प्रकार चालू आहे, याची काहीही कल्पना आली नाही. शेजारच्या दुकानातील कामगार त्यावेळी टीव्हीवर बातम्या पाहत असल्याने त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असले तरी त्यांना त्याची कल्पना आली नाही. सीसीटीव्हीवर मिळालेल्या छायाचित्रांवरून पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.