रविवार ठरला थंडीचा! देशभरातील पठारी भागात पुण्यातील तापमान सर्वांत कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 10:02 AM2022-11-07T10:02:56+5:302022-11-07T10:03:45+5:30
सरासरीच्या तुलनेत ते ३.१ अंश सेल्सिअसने कमी...
पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. परिणामी पुणेकरांसाठी रविवार हा या हंगामातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. केवळ राज्यातच नाही, तर देशभरातील पठारी भागात पुण्याचे सर्वात कमी तापमान १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सरासरीच्या तुलनेत ते ३.१ अंश सेल्सिअसने कमी आहे.
दरवेळी उत्तरेत बर्फवृष्टी सुरु झाली की, त्याचा परिणाम होऊन थंड वारे दक्षिणेकडे येतात. त्यामुळे मध्य प्रदेशासह महाराष्ट्रात हुडहुडी भरू लागते. यंदा पंजाबसह हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्याचवेळी मराठवाडा, तेलंगणा, आसाम, मेघालय, गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमधील किमान तापमान घटले आहे. शनिवारी पूर्व मध्य प्रदेशातील मनड येथे सर्वांत कमी १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. रविवारी पुण्यात सर्वात कमी १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.
थंडीचा कडाका राहणार कायम :
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १२.७, लोहगाव १५, जळगाव १४.७, महाबळेश्वर १५.५, कोल्हापूर २०.५, नाशिक १३.४, सांगली २०, सातारा १६.९, मुंबई २३.५, सांताक्रुज १९.६, रत्नागिरी २३.१, पणजी २४.२, डहाणू १९.७, उस्मानाबाद १५.४, औरंगाबाद १३, परभणी १४.९, नांदेड १६.६, अकोला १८.४, अमरावती १६.१, बुलढाणा १७, ब्रह्मपुरी १९.२, चंद्रपूर १७.२, गोंदिया १६.२, नागपूर १८, वाशिम १६.६, वर्धा १८.८.