सुनेत्रा पवार यांनी हात जाेडत उत्तर देणे टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:49 AM2024-04-15T09:49:16+5:302024-04-15T09:50:07+5:30
शिरूरचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी प्रचार केला. त्यावेळी सुनेत्रा पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उत्तर देणे टाळले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असे विधान करीत अजित पवार गटाच्या बारामती लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्या विधानाबाबत सुनेत्रा पवार यांना विचारले असता, त्यांनी हात जोडत उत्तर देणे टाळले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूरचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी प्रचार केला. त्यावेळी सुनेत्रा पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उत्तर देणे टाळले.
लढाई नात्याची नाही
नाते नात्याच्या जागी आणि राजकारण राजकारणाच्या जागी आहे. ही राजकीय विचाराची लढाई आहे. मला उमेदवारी द्यावी, अशी जनतेची मागणी होती. आता जनता हेच माझे कुटुंब आहे. मोठी माणसं सुनेची निवड करतात, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
आजपर्यंत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला. आता स्वतःसाठी प्रचार करीत आहात, याबाबत काय सांगाल? या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, स्वतःसाठी प्रचार करावा लागतो, त्यावेळी जबाबदारीची भावना असते. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जी विकासकामे आवश्यक आहेत, ती येत्या काळात निश्चित केली जातील.