Rupali Patil: सुनील कांबळेंची आमदाराच्या खुर्चीवर बसण्याची लायकी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 02:38 PM2021-09-26T14:38:28+5:302021-09-26T14:55:14+5:30
पुण्यातील महिला वर्ग सूट देणार नसल्याचा इशारा मनसेच्या रुपाली पाटील यांनी यावेळी दिला आहे.
पुणे : पुणे महापालिकेच्या महिला कर्मचारी यांना बिल काढण्याच्या किरकोळ कारणावरून भाजप आमदाराकडून अत्यंत घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या जातात. हि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा लोकप्रतिनिधींना मनसे अजिबात सोडणार नाही. सुनील कांबळे तुम्ही आमदारांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही. तुम्हाला पुण्यातील महिला वर्ग सूट देणार नसल्याचा इशारा मनसेच्या रुपाली पाटील यांनी यावेळी दिला आहे.
''तुम्ही भंगार बिनलायकीचे आमदार आहात. तुमच्या घरी माता, बहिणी असूनही या महिलेला तुम्ही आई बहिणीवरून शिवाय देताय. ती ऑडिओ क्लिप ऐकायलाही नको वाटतंय. अशी तुमची जीभ घसरली कशी काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.''
''महिलेनं फक्त कांबळेंना वरिष्ठांशी बोला एवढंच सांगितलं. तर अर्वाच्च भाषेत शिव्या देण्याचं कारण काय. पुण्याचे महापौर, भाजप नेते, यांना विनंती आहे कि, त्यांनी त्वरित कांबळेंवर पक्षाच्या वतीनं कारवाई करावी. पुण्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी भान ठेवा. कि कुठल्याही महिलेशी अर्वाच्च भाषेत बोलणं महागात पडेल. हि महिला कर्मचाऱ्याशी बोलण्याची भाषा नाही. अशाना सूट देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.''
चित्रा वाघ तुमची भूमिका काय
चित्रा ताई तुम्ही नेहमी स्त्रियांवर अन्याय झाला कि आवाज उठवता. आता तुमच्या पक्षातीलच एका नेत्यानं महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. आता याक्षणी तुम्ही काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. असंही पाटील म्हणाल्या आहेत.
आमदारावर कठोर कारवाई व्हावी - राष्ट्रवादी काँग्रेस
भाजपामध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्याबाबत व त्यांना हिन वागणुकीतुन तुच्छ लेखण्याबाबत “बौद्धिके “दिले जातात की काय असा आमचा विश्वास बळावत चालला आहे. प्रशांतपरिचारक, राम कदम, प्रविण दरेकर हे नेते सातत्याने महिलांबद्दल वादग्रस्त विधाने करत असतात. केंद्र सरकार आपले आहे ह्या मस्तीतून वारंवार सर्वांना दमदाटीचे प्रकार घडत आहे. या वाचाळविराच्या वक्तव्यानंतर भाजपा ने ह्या संबंधित आमदारांवर जर कारवाई केली नाही तर नैतिकतेचा टेंभा मिरवण्याच-या भाजप चा मुखवटा पुन्हा ऐकदा फाटणार आहे. संबंधित ऑडीओ क्लीपची सखोल चौकशी करावी व त्याच्याच्या सत्यतेनंतर संबंधितावर कठोर कारवाई व्हावी तसेच संबंधित महिला अधिका-याला ही संरक्षण द्यावे ही. अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे.
काय आहे प्रकरण?
संबंधित महिला अधिकारी ह्या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेता त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली.