पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनिल कांबळे निश्चित : औपचारिक घोषणा बाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 01:03 PM2019-03-01T13:03:59+5:302019-03-01T13:09:49+5:30
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक येत्या पाच मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. ..
पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या वतीने सुनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून कांबळे यांचा एकच अर्ज आल्याने स्थायीचे अध्यक्षपद कांबळे यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने स्मिता कोंढरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. राज्यात आता शिवसेना -भाजपची युती झाल्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कांबळे यांची निवड ही केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक येत्या पाच मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज होती. स्थायी समिती सदस्यपदी सुनिल कांबळे यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सुनिल कांबळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळिक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी आणि कॉग्रेस आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीच्या स्मिता कोढरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विरोधीपक्षनेते दिलीप बराटे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.
स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४ तर शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य आहेत. महापालिकेत भाजप एकहाती सता आहे. त्यात शिवसेना -भाजपची युती झाल्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता येत्या ५ मार्च रोजी कांबळे यांच्या नावाची औपचारिकरित्या अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात येईल.
---------------
विषय समितीच्या सदस्यांची आज निवड
शहर सुधारणा, महिला व बाल कल्याण, किडा, विधी समितीच्या सदस्यपदाची नियुक्ती शुक्रवारी होणा-या मुख्य सभेत केली जाणार आहे. या प्रत्येक समितीच्या सदस्यांची एकूण संख्या १३ आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपचे ८, राष्ट्रवादीचे ३, कॉग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी १ सदस्य असणार आहेत.