उपमहापौरपदी सुनीता वाडेकर विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:35+5:302021-04-07T04:10:35+5:30
पुणे : शहराच्या उपमहापौरपदी मंगळवारी (दि.६) झालेल्या निवडणुकीत भाजप, रिपाइं आघाडीच्या उमेदवार सुनीता वाडेकर विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी ...
पुणे : शहराच्या उपमहापौरपदी मंगळवारी (दि.६) झालेल्या निवडणुकीत भाजप, रिपाइं आघाडीच्या उमेदवार सुनीता वाडेकर विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना महविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या लता राजगुरू यांनी निवडणूक लढविली होती. वाडेकर यांना ९७ तर राजगुरू यांना ६१ मते मिळाली.
महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असेलल्या भारतीय जनता पक्षाने शेवटच्या वर्षाकरता मित्र पक्ष रिपाइंला उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रिपाइंच्या गटनेत्या वाडेकर यांना यंदा संधी देण्यात आली. भाजपचे बहुमत असल्याने वाडेकर यांचा विजय निश्चित होता.
मंगळवारी या निवडीसाठी ऑनलाईन मतदान घेत निवडणुकीची औपचारिकता पार पडली. पालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपने पहिल्या वर्षी रिपाइंला उपमहापौर दिले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये भाजपने उपमहापौर म्हणून सरस्वती शेंडगे यांना संधी दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आजच्या निवडणुकीत वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली. अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
-------