सुप्यातील दरोडा प्रकरण: दरोडा, गोळीबार प्रकरणातील तिसरा सहआरोपी पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 09:54 PM2023-04-03T21:54:39+5:302023-04-03T21:55:14+5:30

तीनही आरोपींना बारामती येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १० एप्रिल पर्यंतची पोलिस कोठडी देण्यात आली आहे...

Supa robbery case Third co-accused in robbery arrested by police pune crime news | सुप्यातील दरोडा प्रकरण: दरोडा, गोळीबार प्रकरणातील तिसरा सहआरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सुप्यातील दरोडा प्रकरण: दरोडा, गोळीबार प्रकरणातील तिसरा सहआरोपी पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

सुपे (पुणे) :बारामती तालुक्यातील सुपे येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दरोडा व गोळीबार प्रकरणातील तिसऱ्या सहआरोपीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश मिळविले असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. तीनही आरोपींना बारामती येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १० एप्रिल पर्यंतची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

येथील महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफी दुकान शुक्रवारी सायंकाळी (दि. ३१) दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला. तरुण ग्रामस्थ व पोलिसांच्या धाडसामुळे त्याच दिवशी एका दरोडेखोरास पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी रात्रीत तपासाची दिशा फिरवत २४ तासांच्या आत शनिवारी पहाटे दुसऱ्या दरोडेखोरास पकडण्यास पोलिसांना यश आले. त्यानंतर रविवारी तिसऱ्या सहआरोपीला पोलिसांनी खेडशिवापूर येथील लॉजवरुन मोठ्या शिताफीने पकडले.

या घटनेत पवन जगदीश विश्वकर्मा (वय २०, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश), प्रदीप भैय्यालाल बिसेन, तर सहआरोपी कोमल नितीन गौतम ( वय २४ रा. गोंदिया) या तिघांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली असून या कटात सहभागी असणारे व गाडीतून पळून गेलेले विष्णू पंडित, सुभाष मेश्राम सर्व राहणार गोंदिया यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. यातील गौतम हा सहआरोपी हा खेडशिवापूर येथील हॉटेल रॉयल ब्लूमध्ये लपून बसला होता. त्यामुळे पोलिसांना मोठ्या शिताफीने आरोपीला पकडण्यात यश आले. त्याच्याकडे धारधार शस्त्र, गॅस कटर, फेस मास्क, नोजमाक्स, तीन लॅपटॉप, चांगल्या कंपनीचे मोबाईल, हॅन्ड ग्लोज तसेच स्पॉट नकाशे आदी साहित्य पोलिसांना मिळाले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांनी दिली.

दरोडेखोरांनी सुमारे ११ लाख, ३९ हजार, ८०० रुपयांचे दागिने पळवले होते. तर सुमारे ८३ हजार, ४०० रुपयांचे अंगठी सारखे दागिने हातात घालून गेले होते. यापैकी सुमारे साडेअकरा लाखांची दागिन्यांची पिशवी लागलीच मिळाली. गुन्ह्यात वापरलेली किया कंपनीची गाडी क्रमांक एमएच ३५ ए आर ६१२५, दोन पिस्तूल, २४ जिवंत काडतुसे व एक मोबाईल असा माल पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती शेख यांनी दिली.

Web Title: Supa robbery case Third co-accused in robbery arrested by police pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.