वरवरचे तरंग आकर्षक, पण ‘गहराई’ महत्त्वाची

By श्रीकिशन काळे | Published: November 17, 2024 07:59 PM2024-11-17T19:59:32+5:302024-11-17T20:00:55+5:30

दुरजॉय दत्ता : डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रंगला तरुणाईसोबत धमाल संवाद

Superficial ripples are attractive, but 'depth' matters Popular young writer Durjoy Datta | वरवरचे तरंग आकर्षक, पण ‘गहराई’ महत्त्वाची

वरवरचे तरंग आकर्षक, पण ‘गहराई’ महत्त्वाची

पुणे : "मी तरुणाईचा लेखक आहे. तरुणाईशी जोडलेला आहे. तरुणाईविषयी लिहिणारा आहे. मात्र, संख्येपेक्षा मानवी नात्यांची गुणवत्ता महत्त्वाची असते, यावर माझा ठाम विश्वास आहे", असे मत लोकप्रिय युवा लेखक दुरजॉय दत्ता यांनी तरुणाईशी संवाद साधताना व्यक्त केले. वरवरचे तरंग आकर्षक वाटले, तरी नात्याची 'गहराई' महत्त्वाची असते असेही दत्ता म्हणाले.

दकनी अदब फाउंडेशन आयोजित डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल अंतर्गत रविवारचे दुसरे सत्र, तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगतदार झाले. दुरजॉय दत्ता यांची तरुणाईमधील प्रचंड लोकप्रियता या सत्रादरम्यान रसिकांनी अनुभवली. लेखिका सुधा मेनन यांनी दत्ता यांच्याशी संवाद साधला. महोत्सव समन्वयक मोनिका सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महोत्सवाचे आयोजक जयराम कुलकर्णी आणि मनोज ठाकूर हे देखील उपस्थित होते.

'मी किशोरावस्थेपासून लेखनाला सुरवात केली', असे सांगून दत्ता म्हणाले, "माझे लेखन आणि माझे जगणे, तेव्हा अभिन्न होते. जे जगत होतो, ते लिहीत होतो, त्यामुळे माझे अनुभव, माझी भाषा, नाती, भवताल आणि वातावरण माझ्या आणि माझ्या पिढीच्या जगण्यापासून निराळे नव्हते. त्यामुळे मी फार लवकर तरुणाईशी कनेक्ट होत राहिलो. पदवीधर होण्यापूर्वीच माझ्या सहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या आणि त्या बेस्ट सेलर होत्या."

"मी काॅलेजमधून बाहेर पडलो आणि एक नवे विश्व समोर आले. त्यानंतर मला मोठी गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे जगातला प्रत्येक अनुभव आपण स्वतः घेऊ शकत नाही. अनुभव स्वतःचा नसूनही आपण त्याविषयी लिहू शकतो. लेखक म्हणून आपल्या संवेदनशीलतेच्या तीव्रतेवर लेखनाचा दर्जा ठरतो, हे उमगल्यावर माझे लेखन बदलत गेले. प्रस्थापित लेखकांच्या जगात मला 'कॅंपस नाॅव्हेलिस्ट' म्हटले जात होते. तोवर माझ्याविषयी इतरांचे मत काय आहे, कसे असले पाहिजे, याला मी सर्वाधिक महत्त्व देत होतो. पण नंतर हे वाटणे बदलत गेले', असे दुरजॉय म्हणाले.

''वाढत्या वयाने काहीशी परिपक्वता आली असावी', असे मिष्किलपणे म्हणत दुरजॉय दत्ता यांनी मानवी नातेसंबंधांवर भाष्य केले. "सध्याची पिढी इन्स्टाग्रामवरच्या रील्ससारखे जगते. काही सेकंदांचा त्यांचा अटेंन्टिव्हनेस असतो. अशा वेळी लेखक म्हणून तरुणाईला दोनशे पानांपर्यंत टिकवून ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. काही सेकंदाचे रील आणि काही पानांचा मजकूर, यात लक्षवेधक काय ठरेल, हा आजच्या लेखकांपुढचा यक्षप्रश्न आहे. त्याचप्रमाणे आगामी १० वर्षांत लेखकांऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेची यंत्रणा लेखन करू लागणार, असे चित्र दिसत आहे. पण यंत्र, तंत्र कितीही प्रगत झाले, तरी त्या त्या पिढीतले लेखक तयार होतीलच", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तरार्धात प्रेक्षागृहातील तरुणाईच्या प्रश्नांचीही दुरजॉय यांनी उत्तरे दिली.

अगोदर पहिल्या सत्रात योगेश त्रिपाठी लिखित ‘चौथी सिगारेट’ या हिंदी नाटकाचे सादरीकरण झाले. या नाटकाला २०१९ साली मोहन राकेश सन्मानने गौरविण्यात आले आहे. नाटकाची निर्मिती युवराज शाह यांची असून धनश्री हेबळीकर या कलात्मक दिग्दर्शिका तर अभिजित हे नाटकाचे दिग्दर्शक आहेत. पुणेकरांनी या हिंदी नाटकाला हजेरी लावत उत्तम प्रतिसाद दिला. आर जे बंड्या यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Superficial ripples are attractive, but 'depth' matters Popular young writer Durjoy Datta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे