.... अन उलगडले असामान्य व्यक्तिमत्वांचे अलौकिक पैलू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 05:03 PM2018-08-22T17:03:42+5:302018-08-22T17:12:18+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सशस्त्र सैन्याची निर्मिती आणि महात्मा गांधीच्या दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा हे सर्व एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व उलगडत गेले.
पुणे : ’ आग्र्याहून सुटका’ हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचा आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीला कलाटणी देणारा प्रसंग, लोकमान्य टिळकांनी ज्ञानहेतू व कर्महेतू या जीवनध्येयामधील प्राधान्यक्रम कसा ठरवला आणि ती साध्य करण्यासाठी वेळेचे आणि माणसांचे व्यवस्थापन, तणाव आणि भावनांचे नियोजन कसे केले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केवळ दोन वर्षात अर्धे जग पालथे घालून
सशस्त्र सैन्याची निर्मिती कशी केली आणि महात्मा गांधींनी दांडी येथे केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाची प्रेरणा काय होती, अशा एकेका प्रसंगातून असामान्य व्यक्तिमत्वांचे कर्तृत्व पुणेकर रसिकांसमोर उलगडत गेले.
इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ यांच्यातर्फे ‘गोल्डन हेरीटेज संस्कारमाला’ या चार दिवसीय व्याख्यानमालेचे निमित्त होते. या कार्यक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजीमहाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील काही प्रमुख प्रसंगांचे सखोल विवेचन करताना उपस्थितांना या व्यक्तींच्या गुणवैशिष्ट्यांची ओघवत्या शैलीत ओळख करून दिली.
लोकमान्य टिळकांनी त्यांच्या जीवनात, संशोधक, राजकीय पुढारी, विचारवंत अशा वेगवेगळ्या भूमिकांमधील समन्वय कसा साधला हे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उपस्थितांना उलगडून दाखवले. शिवाजीमहाराजांचे धैर्य, परिस्थितीचा सर्वंकष केलेला अभ्यास, वेळेचा आणि पयार्यांचा सुयोग्य वापर, उद्दिष्टांप्रत असलेली निष्ठा, समविचारी माणसांची निर्माण केलेली व्यवस्था आणि संवादमार्ग यामुळे ते या आपत्तीचा यशस्वी सामना करू शकले. या प्रसंगाला उदाहरण म्हणून घेत डॉ. नाडकर्णी यांनी शिवाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सर्वांसमोर मांडले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वगुण, जागतिक स्तरावरील राजकारण हाताळण्याचे कौशल्य, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि त्यासाठी वैयक्तिक सुुखांचा केलेला त्याग या व्यक्तिमत्व विशेषांचे दर्शन घडते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या दैदिप्यमान कालखंडाची एकहाती उभारणी करणा-या नेताजींच्या गुणवैशिष्ट्यांचा डॉ. नाडकर्णी यांनी वेध घेतला. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मैलाचा दगड आहे. सर्व जगात नोंद घेतल्या गेलेल्या या सत्याग्रहामागील गांधीजींची व्यावहारिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचारमंथन, सत्याग्रहाचे नियोजन, अंमलबजावणी, मिळालेला प्रतिसाद आणि स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीवर त्याचे झालेले दूरगामी परिणाम याबद्दल डॉ. नाडकर्णी यांनी विवेचन केले. राष्ट्रगीताने या व्याख्यानमालेचा समारोप झाला.