येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार यांची बदली; तळोजा मध्यवर्ती कारागृहात रुजू होण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:06+5:302021-09-05T04:14:06+5:30
पुणे : गेल्या काही वर्षांपासून येरवडा कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहणारे उमाजी तोळाराम उर्फ यु. टी. पवार यांची बदली ...
पुणे : गेल्या काही वर्षांपासून येरवडा कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहणारे उमाजी तोळाराम उर्फ यु. टी. पवार यांची बदली करण्यात आली असून, तळोजा मध्यवर्ती कारागृहात रुजू होण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत.
यु. टी. पवार हे काही वर्षांपासून कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. मात्र, त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. गँगस्टर गजानन मारणे याने देखील न्यायालयीन सुनावणीकरिता हजर होण्यासाठी परवानगीच्या बदल्यात अधीक्षकांनी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. परंतु त्यांनी हा आरोप फेटाळला होता. याशिवाय येरवडा कारागृहातील कामकाजासंदर्भात देखील अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या नियम 5 मधील तरतुदींचे पालन करून यु. टी. पवार यांची प्रशासकीय कारणास्तव तळोजा मध्यवर्ती कारागृहात बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची कारागृह महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-----------------------------------------------