Pune: कामगाराचा खूनाप्रकरणी सुपरवायझरला जन्मठेप, प्रत्यक्षदर्शी महिलेची साक्ष ठरली महत्त्वाची
By नम्रता फडणीस | Published: April 3, 2024 06:14 PM2024-04-03T18:14:51+5:302024-04-03T18:35:58+5:30
या प्रकरणात भाजीसाठी निघालेली प्रत्यक्षदर्शी महिला व राठोडच्या प्रेयसीची साक्ष महत्त्वाची ठरली....
पुणे : प्रेयसीला त्रास देत असल्याच्या कारणावरून कंपनीतील कामगाराच्या पोटात चाकू खुपसून खून करणाऱ्या सुपरवायझरला न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद केले आहे. सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात भाजीसाठी निघालेली प्रत्यक्षदर्शी महिला व राठोडच्या प्रेयसीची साक्ष महत्त्वाची ठरली.
संतोष शहाजी राठोड (वय २६, मूळ रा. शिंगोली (तांडा), जि. उस्मानाबाद) असे शिक्षा झालेल्याचे, तर दामोदर कृष्णा जबल (रा. धारावी, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीतील लेबर कॉन्ट्रॅक्टर अमित जाधव यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 20 ऑगस्ट 2018 रोजी शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे ही घटना घडली. जबल व राठोड हे येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. याठिकाणी जबल हा कामगार तर राठोड हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. कंपनीतील तरुणीशी राठोड याचे सूत जमले होते. जबल त्या तरुणीला मोबाइलवर मिसकॉल देत होता. राठोड याने प्रेयसीकडून संबंधित नंबर घेत संपर्क केला. प्रेयसीला सतत कॉल करत त्रास देत असल्याच्या कारणावरून 18 ऑगस्ट रात्री १२.३० च्या सुमारास दोघांमध्ये भांडणे झाली. भांडणावेळी राठोडने जबर याला जबर मारहाण केली.
घटनेच्या दोन दिवसांनंतर राठोड याने कंपनीच्या प्रवेशद्वारावरच जबल याच्यावर चाकून वार केले. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणात, राठोड याला अटक करत त्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर व सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. त्यांनी पंधरा साक्षीदार तपासले. याप्रकरणात तत्कालीन शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक मयूर वैरागकर यांनी तपासी अंमलदार म्हणून काम पाहिले.
प्रेयसीच्या साक्षीमुळे समोर आले खुनाचे खरे कारण :
जबलचा खून केल्यानंतर राठोड याने प्रेयसीशी संपर्क केला. त्याने माझा मोबाइल नंबर डिलीट कर व माझी छायाचित्रेही काढून टाक. मला फोन करू नको असे तिला सांगितले. त्यावेळी हा दुचाकीवरून कुठेतरी चालला आहे हे फोनवरून समजल्याची साक्ष प्रेयसीने न्यायालयाला दिली. त्यानंतर, जबलच्या खुनाचे कारण स्पष्ट झाले.