पर्यवेक्षक अतिरिक्त ताणाखाली
By Admin | Published: November 23, 2015 12:39 AM2015-11-23T00:39:44+5:302015-11-23T00:39:44+5:30
महापालिका शाळांच्या पर्यवेक्षकांवर एका वेळेस अनेक कामांचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे शिक्षण प्रशासनाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उदासीनता निर्माण आहे.
पिंपरी : महापालिका शाळांच्या पर्यवेक्षकांवर एका वेळेस अनेक कामांचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे शिक्षण प्रशासनाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उदासीनता निर्माण आहे. दिवसभर बैठका, अहवाल शासनाची कामे, वरिष्ठांचा आदेश अशा व्यस्त कामांमुळे पर्यवेक्षकांना शाळेमध्ये पायपीट करावी लागत आहे.
पर्यवेक्षकांना वर्षभरामध्ये विविध प्रकारची शाळास्तरावरील कामे करावी पार पाडावी लागतात. पाठ्यपुस्तकांची बालभारतीकडून मागणी करणे, पुस्तकांचे शाळेत वेळेत १५ जूनपूर्वी वाटप करणे, शालाबाह्य मुलांची जबाबदारी, शासनाच्या यू-डायसमध्ये माहिती भरणे, शाळा तपासणी अशा एक ना अनेक प्रकारच्या कामांची जबाबदारी पर्यवेक्षकांच्या माथी मारली जात आहे. यामुळे पर्यवेक्षक अतिरिक्त ताणाखाली वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रशासनाने बैठका बोलावल्या की, हातातील काम सोडून शिक्षण विभागात तत्काळ हजर राहावे लागत आहे. मीटिंग झाली की, बैठकीत दुसराच विषय मंजूर होतो. पहिले काम अर्धवटच राहते आणि दुसऱ्या कामाला लागावे लागते. पहिल्या कामासाठी पुन्हा दिवस संपून रात्र उजाडते, तरीही हातातले काम संपत नाही. यामुळे पर्यवेक्षकांवरचा कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. आकृतिबंधानुसार पर्यवेक्षकांची गरज लक्षात घेता २७ पर्यवेक्षकांची गरज शिक्षण मंडळ प्रशासनाला आहे. २२ शाळांमागे एक पर्यवेक्षक असणे गरजेचे आहे. सध्या ५ पर्यवेक्षक आहेत. खासगी शाळा ४४८, तर मनपाच्या १४८ शाळा आहेत. तसेच मनपा शिक्षक संख्या १४९४ व खासगी शिक्षक संख्या ६६२५ आहे. तर मनपा विद्यार्थी संख्या ४९,२५३ आहे. खासगी विद्यार्थी संख्या २,५८,२७१ आहे. ही संख्यात्मक आकडेवारी लक्षात घेता पर्यवेक्षकांची संख्या त्या तुलनेत अपुरी आहे. शाळेतील विविध खेळ, तसेच विविध दिनविशेष साजरे करण्याचेही नियोजन वेगवेगळे असते. मतदार दिन, पल्स पोलिओ, हँडवॉश दिन, शिक्षक दिन, पर्यावरण दिन, लोकसंख्या दिन साजरे करण्यासाठी तयारी करणे. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहविचार सभा घेणे, कुटुंब सर्वेक्षण सभेत सहविचार मार्गदर्शन करणे, खासगी शाळेतील २५ टक्के दुर्बल व आर्थिक दुर्बल घटकांतील प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे, शालेय पोषण आहार कामकाज पाहणी करणे, शासकीय बैठकांना हजर राहणे, शिक्षण मंडळ बजेट तयार करून देणे, सरल प्रणालीत विद्यार्थ्यांचा डाटा भरणे आदी कामे करावी लागतात. (प्रतिनिधी)