women day 2020 : तुम्हीही सुपरवुमन सिंड्रोमच्या बळी नाही ना ; जाणून घ्या कारणं आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:58+5:302020-03-08T06:05:08+5:30
लक्षणं ओळखून उपचार घेणाऱ्या खूप कमी जणी असल्या तरी दुसरीशी बरोबरी करून रडत, कुढत, मन मारून जगणाऱ्या आणि तरी चेहऱ्यावर खोटं हसू ठेवणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नेहा सराफ :
अस्मिता...शाळेत कायम पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणार.. ऑफिसमध्येही तिच्या कामाचं कायम कौतुक होतं, घरातही आदर्श सून, पत्नी आणि आई म्ह्णवली जाते. पण गेले काही दिवस तिची चिडचिड प्रमाणाबाहेर वाढत आहे. आदर्श होण्याच्या नादात तिने स्वतःला कामात इतकं जखडून घेतलं आहे की इतरांनीही तसंच वागावं अशी तिची अपेक्षा आहे. नवराच नाही तर तिला ओळखणारा प्रत्येक जण तिच्या कटकट्या स्वभावाला वैतागला आहे. तिलाही क्षणात राग येतोय, रडू येतंय, अस्वस्थ वाटतंय अशी विचित्र लक्षणं जाणवत आहेत. अखेर समुपदेशनासाठी गेली तेव्हा तिला कळलं ते सुपर वुमन सिंड्रोमबद्दल.
मी आयुष्यातल्या प्रत्येक आघाडीवर लढून पहिलंच स्थान मिळावेन असा अट्टाहास असणाऱ्या अनेकींना सध्या या सिंड्रोमने जखडलं आहे. आदर्श मुलगी,पत्नी, आई, सून, कर्मचारी अशा प्रत्येक ठिकाणी 'परफेक्ट' असण्याचा अट्टाहास अनेक जणींचे खच्चीकरण करताना दिसत आहे. वेळीच लक्षणं ओळखून अस्मितासारख्या उपचार घेणाऱ्या खूप कमी जणी असल्या तरी दुसरीशी बरोबरी करून रडत, कुढत, मन मारून जगणाऱ्या आणि तरी चेहऱ्यावर खोटं हसू ठेवणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
अनेकदा शक्य असतानाही केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न करून महिला स्वतःकडे जबाबदाऱ्या घेतात. नवरा, मुलं आणि सहकारीसुद्धा त्यातल्या काही जबाबदाऱ्या पार पडू शकत असताना 'मीच करणार' ही जिद्द त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दमवणारी असते. त्यांची ही जिद्द हळूहळू हट्टामध्ये बदलते आणि पहिला परिणाम त्यांच्यावरच होतो. अनेक शारीरिक आणि मानसिक आजार सुरु होतात. मी प्रत्येकाचं करते पण मला कोणीच समजून घेत नाही ही जाणीव इतकी भिनते की त्या मानसिक दृष्टया कोलमडतात आणि नैराश्याच्या मार्गाने अगदी आत्महत्येपर्यंतही पोहचू शकतात.
याबाबत समुपदेशक डॉ वैजयंती पटवर्धन म्हणतात की, 'मुळात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी उशिरा मिळाली आहे. त्यामुळे त्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक धडपड करतात. स्वतःची शारीरिक क्षमता लक्षात न घेता ध्येय गाठण्यासाठी पळतात. त्यात भारतीय स्त्रियांना कुटुंब आणि करिअर असा संगम साधायचा असतो. त्यामुळे सगळ्या आघाड्यांवर अग्रस्थानी असण्याचा आग्रह वूमन सिंड्रोममध्ये बदलतो. त्यामुळे स्वतःच्या मर्यादा ओळखून, झेपतील अशी ध्येय ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येणारं नैराश्य टाळता येणे शक्य नाही'.
सुपर वूमन सिंड्रोम :
- कारणं :
कायम परफेक्शनिस्ट असण्याचा अट्टहास
कायम कौतुकच व्हावे अशी अपेक्षा
स्पर्धेत पहिलेच येण्याचा ध्यास
मनातले न बोलल्याने साठलेले एकटेपण
- लक्षणं :
कोणत्याही कारणावरून चिडचिड होणे
क्षुल्लक गोष्टीवरून रडू येणे
विसराळूपणात वाढ
अस्वस्थता, सतत घाम येणे
- परिणाम :
बी.पी. वाढणे
हॉर्मोन बॅलन्स बिघडणे
कशातही मन न लागणं
आत्मविश्वास कमी होणे
- उपाय :
स्वतःला वेळ द्या
छंद, आवडीनिवडी आवर्जून जोपासा
स्पष्टपणे नाही म्हणायला शिका
स्वतःचे अपयश स्वीकारा